अल्पवयीन मुलगी २२ आठवड्यांची गरोदर; प्रियकरावर गुन्हा दाखल

पंचवटी : महाविद्यालयात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर प्रेमाच्या जाळ्यात ओढत तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, पीडित मुलगी २२ आठवड्यांची गर्भवती आहेे. याप्रकरणी तरुणाविरुद्ध म्हसरुळ पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोस्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वेश गोपाळ निकुंभ (वय – २४, रा. दरी-मातोरी, मखमलाबाद, ता. जि. नाशिक) असे संशयित तरुणाचे नाव आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दरी-मातोरी परिसरातून महाविद्यालयात येत-जात असताना संशयित आरोपी सर्वेशने तिच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर त्याने १ जून ते ५ नोव्हेंबर या कालावधीत वेळोवेळी मखमलाबाद गावातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. याबाबात कुणास काही सांगीतले तर जीवे मारण्याची धमकी दिली. घडलेला प्रकार कुणास न सांगता मुलगी शांत होती. या संबधातून मुलीला गर्भधारणा झाली. हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आला. याबाबत विचारणा केली असता मुलीने काहीच सांगितले नाही. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. गुन्हा शहर पोलिसांच्या हद्दीत घडल्याने गुन्हा म्हसरुळ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.