मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून खासदार नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यामध्ये वाद सुरू आहे. नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले आहे. अमरावतीमधील या दोन्ही प्रमुख महिला राजकारण्यांमधील वाद हा विकोपाला गेलेला असताना या वादामध्ये आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी उडी घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांविरोधात बच्चू कडू पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (MLA Bachhu Kadu’s jump in Navneet Rana-Yashomati Thakur dispute)
हेही वाचा – संजय राऊतांच्या ‘रोखठोक’ प्रश्नांना मुख्यमंत्री शिंदेंना करावा लागणार ‘सामना’?
या वादाबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, नवनीत राणा यशोमती ठाकूर यांना 2019 साली पैसे दिल्याचा विषय काढत आहेत. हे चुकीचे आहे. सर्वात पहिल्यांदा पैसे देणारा चुकीचा आहे. त्याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहे. कारण, नवनीत राणांनी हे वक्तव्य सर्वांसमोर केले आहे. त्यामुळे रवी राणांनी किती पैसे यशोमती ठाकूर यांना दिले आहेत. अथवा ठाकूर यांनी किती पैसे घेतले? याची चौकशी झाली पाहिजे, असेही बच्चू कडू यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
खासदार नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर थेट आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये यशोमती ताईंना रवी राणांनी कडक नोटा दिल्या होत्या, चेक दिला असता तर, पुरावा असला असता. पण, कडक नोटा दिल्या आहे, हे लहान मुलांनाही माहिती आहे की याचे पुरावे नसतात. आणि इतकं झोमायचं कारण काय याचा अर्थ जे खरं असतं तेच झोमतं असा आरोप नवनीत राणा यांनी कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर केला आहे.
यशोमती ठाकूर यांचे प्रत्युत्तर…
नवनीत राणा यांच्या आरोपांवर संताप व्यक्त करत यशोमती ठाकूर म्हणाल्या की, ते नवरा-बायको म्हणजेच राणा कंपनीने आजवर अमरावती जिल्हा नासवण्याचे काम केले आहे. त्यांचे जिल्ह्यात कोणाशीच पटत नाही. तसेच, मागे ते आमदार बच्चू कडूंबाबत बोलले, मग त्यांनी माफी मागितली. यांनी प्रत्येकावर आरोप केले. काल (ता. 13 सप्टेंबर) आमदार बळवतंराव वानखेडेंबाबत बोलले, मग भाजपा नेते प्रवीण पोटेंबाबत बोलले. मुळात हे राणा दाम्पत्य काय दुधाने धुतलेले आहेत का? हीच सगळ्यात घाणेरडी मंडळी आहे. त्यामुळे मी यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. कारण असे कोणीही काहीही सहन करणार नाही, असे यशोमती ठाकूर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.