गाडीवरील हल्ल्यावरून आमदार बांगर यांची धमकी तर, शिवसेनेकडून प्रत्युत्तर

santosh bangar

अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील काही आमदार सध्या चर्चेत आहेत. त्यापैकी आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर रविवारी शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यावर, जशास तसे उत्तर देण्याची धमकी आमदार बांगर यांनी दिली. तर, वेळ, ठिकाण आणि तारीख सांगा, असे आव्हान शिवसैनिकांनी दिले आहे.

हिंगोलीतील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आधी रडत-रडत बंडखोर आमदारांना शिवसेनेत परत येण्याचे आवाहन केले. पण नंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी ते शिंदे गटात सामील झाले.

यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी संतोष बांगर हे आपल्या कुटुंबीयांबरोबर अमरावतीला देवदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी लाला चौकामध्ये त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. त्यांची गाडी पुढे जात असताना कारवर काही लोकांनी हाताने मारले होते. याप्रकरणी पोलिसांनी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा – तुमचे मंत्री सर्वसामान्यांना धमक्या देताहेत त्यांना तुम्ही आवरणार की नाही?, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट सवाल

या घटनेवरून आमदार संतोष बांगर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माझी बहीण आणि माझी पत्नी माझ्यासोबत नसते, तर एक घाव दोन तुकडे केले असते, असे सांगत संतोष बांगर यांनी जशास तसे उत्तर देण्याची धमकी शिवसैनिकांनी दिली. मात्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी या धमकीला प्रत्युत्तर देत आमदार बांगर यांना आव्हान दिले आहे.

संतोष बांगर यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पोलीस बंदोबस्त बाजूला ठेवावा. तुम्ही कधी, किती लोकांना घेऊन येता ते सांगा, हे माझे त्यांना खुले आव्हान आहे. त्यांनी फक्त वेळ, ठिकाण आणि तारीख सांगावी. तेव्हा बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक कोण आहे, हे तुम्हाला दाखवून देऊ, असे सुधीर सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंजवळ जो रडतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी खोके घेऊन शिंदे गटात जातो, अशा नाटकी माणसाने आम्हाला निष्ठा शिकवू नये, असेही त्यांनी बांगर यांना सुनावले आहे.