नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आपण आमदार अपात्रता सुनावणीही घेणार आहोत. यासाठी आपल्याला विधानसभा आणि सुनावणी असे 12-12 तास काम करावे लागणार आहे. शनिवार-रविवारीही सुनावणी घेणार असून, दोन्ही पक्षकाराकडून सहकार्य झाल्यास वेळेत सुनावणी पूर्ण करता येईल. मात्र अजूनही अर्ज दाखल केले जात असून सुनावणीसाठी अधिक वेळ लागल्यास आणि येत्या 31 डिसेंबर आधी सुनावणी पूर्ण करणे शक्य न झाल्यास सर्वोच्च न्यायालयाकडे निकालासाठी वेळ मागितला जाईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी (7 डिसेंबर) येथे दिली. (MLA Disqualification …will seek time from Supreme Court for hearing Narvekars information)
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे वृत्त संकलन करण्यासाठी मुंबईहून आलेल्या पत्रकारांची निवास व्यवस्था सुयोग येथे करण्यात आली आहे. नार्वेकर यांच्यासह विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज सुयोगला भेट देऊन पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी नार्वेकर यांनी सुनावणी विषयी माहिती दिली. न्याय संस्था आणि विधिमंडळ या दोन्ही संस्था आपापल्या कार्यकक्षेत राहून काम करीत आहेत. यात अंतिम शब्द कोणाचा असेल असे होत नाही. त्यामुळे न्यायालयाने 31 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करून निर्णय देण्यास सांगितले आहे. त्यानुसार वेगाने सुनावणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहेत. मात्र तरीही अधिक वेळ लागण्याची शक्यता निर्माण झाल्यास न्यायालयाला कळवले जाईल, असे नार्वेकर म्हणाले. आमदार अपात्रता सुनावणी वेळेत पूर्ण व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी शनिवार आणि रविवार अशा सुट्टीच्या दिवशीही सुनावणी घेतली जाणार आहे. नागपूर येथेही सुनावणी होईल. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबरला संस्थागित झाल्यास येथील सुनावणीचे दफ्तर, कागदपत्रे लगेच मुंबईला नेणे शक्य होणार नाही. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतरही काही दिवस येथे आमदार अपात्रता सुनावणी होईल, असे नार्वेकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
हेही वाचा : FADNAVIS LETTER BOMB : नवाब मलिक यांना महायुतीत घेऊ नका…..देवेंद्र फडणवीस यांचे अजित पवार यांना पत्र
राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदारांनाही नोटीस
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने डॉ. नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांना अपात्र ठरविण्यासाठी याचिका सादर केल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, विक्रम काळे, अनिकेत तटकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात याचिका सादर केल्या आहेत. या दोन्ही याचिकांविषयी बोलताना गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेत माझे नाव असल्याने ही सुनावणी मी घेणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे ही सुनावणी कधी होणार हे आपण सांगू शकत नाही. मात्र अपात्रतेसंदर्भात राष्ट्रवादीच्या आमदारांना आजच नोटीस पाठवण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.