घरमहाराष्ट्रनाशिकबंद नेमका कशासाठी? शरद पवारांना भाजप आमदाराचा सवाल

बंद नेमका कशासाठी? शरद पवारांना भाजप आमदाराचा सवाल

Subscribe

पूर परिस्थितीसह कोरोना संकटामुळे फटका बसलेल्या नागरिकांना बंदचा मनस्ताप

नाशिक : उत्तरप्रदेशातील घटना निषेधार्ह आहेच, परंतू महाराष्ट्रातून कुणी त्याचे समर्थन केलेले नसतानाही राज्य सरकार व महाविकास आघाडीकडून महाराष्ट्राला वेठीस धरले जाते आहे. पूर परिस्थितीमुळे शेतकर्‍यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा काळात बंद कशासाठी, असा सवाल करत भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत काही सवाल केले आहेत.

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर उतरून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंद आवश्यक होता का? राज्यात इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोनाबाधित सापडल्याने लॉकडाऊन जाहीर करावे लागले होते. त्यातून व्यापारी-व्यावसायिकांसह शेतकर्‍यांचेही नुकसान झाले आहे. आताकुठे परिस्थिती पूर्वपदावर येत असताना महाराष्ट्र बंद करून या घटकांचे नुकसान करणे आवश्यक होते का? राज्यात नवरात्रोत्सवानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. मंदिरे दीर्घप्रतीक्षेनंतर खुली झाली.

- Advertisement -

अशावेळी महाराष्ट्र बंद करून जनतेच्या उत्साहावर विरजण घालणे आवश्यक होते का? राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती. त्यातून शेतकर्‍यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याला महाराष्ट्र बंद करत अधिक अडचणीत टाकणे आवश्यक होते का? पूर ओसरून १० ते १५ दिवस लोटल्यानंतरही नाशिक जिल्ह्यात 83 हजार पैकी केवळ 5 हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र बंद करत पंचनाम्यात अडचणी निर्माण करून शेतकर्‍यांना वेठीस धरणे आवश्यक होते का?

हे प्रश्न आमदार प्रा. फरांदे यांनी उपस्थित केले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे कोणताही संवेदनशील व्यक्ती नकारार्थीच देईल, असे स्पष्ट करताना महाराष्ट्र बंद म्हणजे राजकीय स्वार्थापोटी अडचणीत सापडलेल्या शेतकरी व जनतेला अधिक अडचणीत टाकून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -