मुंबई : 2024 हे वर्ष राजकारण्यासांठी महत्त्वाचं ठरलं कारण या वर्षात लोकसभेसह राज्यसभा आणि विधानसभेच्या महत्त्वपूर्ण निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत राज्यातील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. त्यामध्ये महायुतीने जोरदार विजय मिळवत राज्यात सरकार स्थापन केले. असं असलं तरी आता सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष आता रखडलेल्या महापालिका निवडणुकांसाह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. पण निवडणुकीचा पत्ता नाही अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. अशात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित महापालिका निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. (mla rais shaikh send letter to cm devendra fadnavis and dcm eknath shinde for bmc and other municipal corporation election)
कोरोनाचा संसर्ग, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यांसह विविध कारणामुळे राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. मागील चार वर्षांपासून या निवडणुका घेण्यासाठी विरोधक सत्ताधाऱ्यांकडे मागणी करत आहेत. मात्र अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. अशात राज्यात मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 7 मार्च 2025 पूर्वी घ्या, अशी मागणी करणारे पत्र समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.
रईस शेख यांच्या पत्रात काय?
“मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या महापालिकेची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली. त्यामुळे येत्या ७ मार्चला महानगरपालिकेवरच्या प्रशासकीय कारभाराला तीन वर्षे पूर्ण होतील. देशाच्या आर्थिक राजधानीचा कारभार लोकप्रतिनिधींशिवाय प्रदीर्घ काळ चालणे भारतीय लोकशाहीसाठी अभिमानास्पद नाही. राज्यातील 29 महानगरपालिका, 228 नगरपरिषदा, 29 नगरपंचायती, 26 जिल्हा परिषदा, 289 पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. महायुतीचे सरकार स्थिरस्थावर झाले आहे. आपल्या हाती राज्याची सूत्र आहेत. आपण गतिमान कारभार करणारे राज्यकर्ते आहात. तरी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील प्रलंबित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 7 मार्चपूर्वी घेण्यात याव्यात, अशी लोकप्रतिनिधी या नात्याने माझी मागणी आहे”, असे रईस शेख यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी रईस शेख यांनी लिहिलेल्या पत्राची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दखल घेणार का, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच, त्यांच्या मागणीनुसार महापालिकेसह रखडलेल्या निवडणुका या 7 मार्चपूर्वी होणार का हेही पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा – Dhananjay Munde : धनंजय मुंडेंसाठी बबन तायवडे मैदानात; म्हणाले, ओबीसी म्हणून टार्गेट केले तर…