घरताज्या घडामोडीनागपूर आमदार निवासात दारूड्यांचा उच्छाद; आमदाराकडेच मागितले पैसे

नागपूर आमदार निवासात दारूड्यांचा उच्छाद; आमदाराकडेच मागितले पैसे

Subscribe

सामान्य माणूस दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड देत असतो. मद्यपी टोळक्यांचा उच्छाद सामान्य माणसांना नवीन नाही. राज्याच्या अनेक भागांमध्ये मद्यपीचे टोळके सामान्यांना त्रास देत असतात. त्यामुळे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांना सामान्य माणसासारखे त्रास नसतात, अशी अनेकांची समजूत असते. मात्र आमदारांनाही दारूड्यांचा त्रास सहन करावा लागतो, हे सांगितले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. राज्यभरातले आमदार नागपूरच्या आमदार निवासात राहण्यासाठी आले आहेत. वर्षभर मोकळे असलेल्या या आमदार निवासाला दारूड्यांनी आपला अड्डा बनवला आहे. आता आमदार आले तरी दारूडे काही तिथून जायला तयार नाहीत. या दारूड्यांनी चक्क आमदारांनाच दारूसाठी पैसे मागितले आहेत.

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आज सभागृहात आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत चिंता व्यक्त केली. आमदार निवासातील मद्यपी टोळके त्रास देत असल्याची तक्रारच शेट्टी यांनी केली. आमदार शेट्टी यांना ४ अज्ञात इसमांनी दारू पिण्यासाठी ५०० रुपये मागितले. आमदार शेट्टी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दारूड्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी आमदारांच्या मदतीसाठी पोलीस आमदार निवासात उपस्थित नसल्याचे सचिन शेट्टी यांनी सांगितले.

- Advertisement -

भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी देखील शेट्टी यांची रि ओढत आमदार निवासातील गैरसोयीचा पाढा विधानसभेत वाचला. आमदार निवासात रात्री बाटल्यांचा खच आढळून येत असल्याबद्दल म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली. या मद्यपी टोळक्यांचा तात्काळ बंदोबस्त करुन सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली. यानंतर अध्यक्षांनी आमदारांची सुरक्षा अधिक बळकट करण्याचे निर्देश सरकारला दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -