बीड – संतोष देशमुख हत्याकांडातील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडसह सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन चौकशी समिती करत आहेत. बीड पोलीस दलात अनेक बदल करण्यात आले, पण हत्याकांडातील कृष्णा आंधळे हा आरोपी गेल्या 50 दिवसांपासून फरार आहे. त्याचा थांगपत्ता अजून पोलिसांना लागलेला नाही. आमदार सुरेश धस यांनी कृष्णा आंधळे कोण आहे, कुठे गेला असेल याची सविस्तर माहिती आज दिली.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला
बीड हत्याकांडाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड याच्या भोवतीचा फास पोलिस, एसआयटी आवळत आहे. त्यांची जंगम मालमत्ता जप्त करण्यासाठी एसआयटीने कोर्टाला पत्रही दिले आहे. त्याची स्थावर मालमत्ताही जप्त केली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षातील नेत्यांनी केली आहे. दुसरीकडे वाल्मिक कराड ज्यांचा निकटवर्तीय आहे त्या धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घेण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांवर दबाव वाढत आहे. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला नैतिकतेचे सल्ले कोणी देऊ नये असे खासदार सुळेंना सुनावले आहे.
संतोष देशमुख हत्याकांडाच्या तपासावर आमदार सुरेश धस म्हणाले की, एक आरोपी फरार आहे. कृष्णा आंधळे याचा शोध पोलिस आणि एसआयटी घेत आहे. त्यांचा तपास योग्य पद्धतीने सुरु आहे. बीड जिल्ह्यातील पोलीसही चांगले काम करत आहे. काही वरिष्ठ नेत्यांनी गु्न्हे शाखेतील भागवत आणि शेलार यासारख्यांची नावे घेतली आहेत. मात्र याच पोलिस कर्मचाऱ्यांनी हत्याकांडातील 6 पैकी 5 आरोपींना पकडले आहे. त्यामुळे उगच त्यांचे नाव घेऊन त्यांचा संबंध वाल्मिक कराडसोबत जोडू नये.
कृष्णा आंधळे नेपाळमध्ये गेला का?
फरार असलेला कृष्णा आंधळे हा गरीब कुटुंबातील असल्याचे आमदर सुरेश धस म्हणाले. त्यांनी सांगितले की, कृष्णा आंधळे हा संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीची काही दिवस तयारी करत होता. तिथेच तो गुन्हेगारीकडे वळला. संभाजीनगरमध्येही त्याच्यावर गु्न्हे दाखल आहेत. तो गरीब कुटुंबातील आहे. पत्र्याच्या घरात त्यांचे कुटुंबिय राहतात. तो त्याच्या आई-वडिलांच्याही फार संबंधीत नाही. कुटुंबाच्या संपर्काविना तो राहू शकतो. त्यामुळेच तो आता राज्याबाहेर गेला असण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर तो आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि आता बाहेर देशात नेपाळमध्ये गेला असण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. मात्र त्याला अटक झाली पाहिजे, तो आरोपी आहे. 50 दिवसांपासून तो बेपत्ता आहे. यामुळे पोलिसांच्या तपासवरही अनेकांकडून शंका घेतली जात आहे, मात्र तपास योग्य दिशेने सुरु असल्याचा दावाही आमदार धस यांनी केला.