Homeमहाराष्ट्रमराठवाडाAjit Pawar : डीपीडीसी बैठकीपूर्वी अजित पवारांचे जिल्हा नियोजन; प्रकाश सोळंके, सुरेश...

Ajit Pawar : डीपीडीसी बैठकीपूर्वी अजित पवारांचे जिल्हा नियोजन; प्रकाश सोळंके, सुरेश धसांना पालकमंत्र्यांचा दणका

Subscribe

बीड – जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी अजित पवारांनी बीडमध्ये राजकीय ‘जिल्हा नियोजन’ केल्याची चर्चा सुरु झाली आहे.  जिल्ह्यातील दोन आमदारांना जोरदार धक्का अजित पवारांनी बैठकीपूर्वी दिला आहे. अजित पवारांनी स्वपक्षीय ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके आणि भाजपचे सध्या चर्चित आमदार सुरेश धस या दोघांना जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांच्या यादीतून वगळले आहे. त्यांच्या ऐवजी दोन तरुण आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार धस आणि सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान उठवले आहे, त्याचाच फटका त्यांना बसला असल्याची चर्चा आहे.

तरुण आमदारांना संधी 

राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील सर्वच नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नियोजन समित्यांवर केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी हेच राहिले होते. आता बीड जिल्हा नियोजन समितीवर विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन जागांवर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, केजच्या आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुरेश धस, प्रकाश सोळंके यांचा पत्ता कापला 

राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील सर्वच नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे नियोजन समितीवर केवळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी हेच राहिले होते. आता बीड जिल्हा नियोजन समितीवर विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन जागांवर गेवराईचे राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार विजयसिंह पंडित आणि केजच्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन सदस्यांची नियुक्ती करताना दोन ज्येष्ठ सदस्यांची मात्र गच्छंती झाली आहे. त्यातील एक अजित पवारांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके आणि दुसरे भाजपचे सध्याचे राज्यभर चर्चेत असलेले सुरेश धस यांना वगळण्यात आले आहे.

सुरेश धस हे महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनापासून अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमक आहे. परळीतील पीकविमा घोटाळा मुंडे यांच्या कृषिमंत्रीपदाच्या कार्यकाळात झाला असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यानंतर मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन धनंजय देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रकाश सोळंके हे देखील मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही असल्याचे दिसले.

धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी या दोन्ही नेत्यांनी मागणी केली होती. त्यामुळेच त्यांना जिल्हा नियोजन समितीमध्ये स्थान देण्यात आले नाही का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

अजित पवारांच्या स्वागताला धनंजय मुंडे

धनंजय मुंडे हे दोन दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यात असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे दिल्लीला का गेले ,असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना स्पष्टीकरण देण्यासाठी गेल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. काल त्यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींची भेट घेतली. त्यामुळे आज मंत्री मुंडे डीपीडीसी बैठकीला उपस्थित राहणार की नाही, याची चर्चा होती. मात्र ते अजित पवारांच्या स्वागताला उपस्थित होते आणि डीपीडीसी बैठकीलाही त्यांनी हजेरी लावली.

हेही वाचा : Ajit Pawar : अजित पवारांकडून मुल्यशिक्षणाचे धडे; मकोका लावायला कमी करणार नाही, कार्यकर्त्यांना सज्जड दम