घरमहाराष्ट्रभाजप आमदार बंब खोट्या तक्रारी करून करतात कमाई

भाजप आमदार बंब खोट्या तक्रारी करून करतात कमाई

Subscribe

गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात ते ब्लॅकमेल करत असल्याच्या तक्रारी थेट पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात आल्या आहेत.

गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात ते ब्लॅकमेल करत असल्याच्या तक्रारी थेट पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात आल्या आहेत. माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करत बंब हैराण करत असून, औरंगाबादमध्ये सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामासह सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध कामांबाबत खोट्या तक्रारी करून ते कमाई करत असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

साईनाथ पद्मावार या कंत्राटदाराने तर आपले काही बरेवाईट झाले तर त्याला बंब जबाबदार असतील, असेच थेट मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे सर्वपक्षीय आमदारांनीही बंब यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडेही दाद मागितली आहे. औरंगाबाद विभागात सुरू असलेल्या विविध खात्यांतर्गत कामांमध्ये विशेषत: सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांवर गंगापूरचे भाजपचे आमदार प्रशांत बंब सातत्याने आक्षेप घेतात. यासाठी ते माहितीच्या अधिकाराचा वापर करतात. याद्वारे कंत्राटदारांना पिळतात, अशा तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेत्यांकडे येऊ लागल्या आहेत.

- Advertisement -

सार्वजनिक बांधकाम खात्यातील कामांबाबत तक्रारी करताना साईनाथ पद्मावार या सरकारी कंत्राटदाराने बंब हे औरंगाबादचे उपविभागीय अभियंता एम.ए. मुजिब यांचा हवाला देत ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला आहे. पद्मावार यांनी बंब यांच्या खोट्यानाट्या तक्रारींमुळे आत्महत्येसारखा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा दिला आहे.
रस्ते उभारणीसाठी खासगी विक्रेत्यांकडून डांबर खरेदी करण्याच्या सूचना 27 जानेवारी 2008च्या परिपत्रकात सार्वजनिक बांधकाम खात्याने दिल्या होत्या. 1 जानेवारी 2016 रोजी याबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली होती. मात्र तरीही 2005 पासूनच्या डांबर वापराच्या पासेस बंब कंत्राटदारांकडून मागत आहेत. ज्या कामांच्या करारनाम्याचा अवधी संपलेला आहे, ज्या कामांचा दोष निवारण कालावधी पूर्ण झालेला आहे, अशा कामांची माहिती मागून बंब ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बिल्डर असोसिएशनही हैराण

बंब हे संसदीय विविध आयुधांचा वापर करत बिल्डरांना हैराण करतात, असा गंभीर आरोप बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया या मुंबईतील संघटनेनेही केला. असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बंब यांच्या कारनाम्याची सविस्तर माहिती दिली होती.

- Advertisement -

या आमदारांनी केली तक्रार

मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदार अब्दुल सत्तार (काँग्रेस), प्रताप पाटील, संजय शिरसाठ (शिवसेना), तानाजी मुटकुळे, मोहन फड (भाजप) या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत बंब यांच्या करामतींची माहिती दिली.

 

बंब यांनी आजवर दीड हजार तक्रारअर्ज केले. भ्रष्टाचार झाला म्हणून एकाही प्रकरणाची तड लावली नाही. उलट यामुळे आमची कामेच थांबली असल्याच्या तक्रारी या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या. बंब हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांबरोबरच पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर कारवाईसाठी दबाव आणतात. मात्र बंब यांच्याविरोधात कोणतीही कारवाई भाजपने केली नाही.
                                                                                                        -आमदार अब्दुल सत्तार (काँग्रेस)

बंब यांच्यामुळे कामे रखडली
प्रशांत बंब यांच्या तक्रारी खर्‍या असत्या तर आमचा आक्षेप नव्हता. त्यांनी त्यांचा पाठपुरावाही करावा, पण तसे ते करत नाहीत. यामुळे अधिकारी कामे करायला तयार होत नाहीत. कंत्राटदारही नको त्या चौकशा, असे सांगू लागले आहेत. मराठवाड्याच्या विकासावर याचा फटका बसतो आहे.
-आमदार मोहन फड (भाजप), पाथरी मतदारसंघ

आमदारांचेही अधिकार्‍यांशी साटेलोटे
मी आजवर केलेल्या चौकशांमुळे मुंबईतील सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरळीत तसेच औरंगाबाद येथील संबंधित कंत्रादारांवर कारवाया झाल्या आहेत. मी ब्लॅकमेल करतो याचा एकतरी पुरावा द्यावा. माझ्यामुळेच आजवर अधिकारी आणि कंत्राटदारांचे साटेलोटे बाहेर आले. यात आता आमदारही सामील झाले आहेत.
-आ. प्रशांत बंब (भाजप), गंगापूर मतदारसंघ

 

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -