Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र 16 आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न लवकरच सुटणार? शिंदे गटाकडून 6 हजार पानांचे लेखी...

16 आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न लवकरच सुटणार? शिंदे गटाकडून 6 हजार पानांचे लेखी उत्तर सादर

Subscribe

शिंदे गटातील आमदारांनी 6 हजार पानांचे लेखी उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केले आहे. त्यामुळे आता 16 आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई : शिवसेनेतील (शिंदे गट) 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निकाल अद्यापही लावण्यात आलेला नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना हे प्रकरण निकाली लावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष अगदी बारकाईने या प्रकरणाचा अभ्यास करत आहेत. या प्रकरणावर निर्णय घेण्यास विलंब होत असला तरी लवकरच या प्रकरणाचा निकाल लावण्यात येईल, असे त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्यातच आता शिंदे गटातील आमदारांनी 6 हजार पानांचे लेखी उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केले आहे. त्यामुळे आता लवकरच हे प्रकरण मार्गी लागणार असल्याचे बोलले जात आहे. (MLAs from Shinde group submitted a 6 thousand page written reply to Assembly Speaker Rahul Narwekar)

हेही वाचा – Rahul Narwekar : आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल कधी? विधानसभा अध्यक्षांनी दिली माहिती

- Advertisement -

राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालावेळी सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असे आदेश दिले. ज्यामुळे ठाकरे गटाकडून चिंता व्यक्त करण्यात आली. परंतु, विधानसभा अध्यक्षांवर आमचा पूर्ण विश्वास असून ते योग्य निर्णय घेतील, असे ठाकरे गटाकडून वारंवार बोलण्यात येत होते. परंतु. त्यानंतर राहुल नार्वेकर या प्रकरणाचा निकाल लावण्यास विलंब लावत असल्याने ठाकरे गटाकडून आमदार सुनील प्रभू यांनी त्यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. ज्यानंतर या प्रकरणी सुनावणी देत न्यायालयाकडून या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आदेश दिले.

सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील आणि ठाकरे गटातील आमदारांना नोटीस पाठवली. या नोटिसीवर त्यांना 14 दिवसांत उत्तर देण्यास सांगितले होते. परंतु, पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान शिंदे गटातील आमदारांनी या नोटिसीवर उत्तर देण्यासाठीची वेळ वाढवून मागितली. परंतु आता शिंदे गटातील आमदारांनी 6 हजार पानांचे लेखी उत्तर सादर केल्याने या प्रकरणाचा निकाल लवकरच लागणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

काय आहे प्रकरण ?

- Advertisement -

महाविकास आघाडीची राज्याच सत्ता असताना शिवसेनेचे आणि त्यावेळी मविआमध्ये नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये पक्षातील 40 आणि 10 अपक्ष आमदारांसोबत बंडखोरी केली. त्यानंतर प्रथमतः ज्या 16 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी केली त्यांच्याविरोधात मूळ शिवसेनेकडून अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली. या नोटीसविरोधात शिंदे गटाने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. परंतु सत्ता संघर्षावरील प्रकरणाचा निकाल देताना कोर्टाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांवर सोपवला. ज्यानंतर या प्रकरणातील नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली.

- Advertisment -