घरताज्या घडामोडीMLC Election 2021: ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर रामदास कदम पुन्हा विधान परिषदेत दिसणार?

MLC Election 2021: ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर रामदास कदम पुन्हा विधान परिषदेत दिसणार?

Subscribe

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या ६ जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. वर्षाच्या अखेरीस विधानपरिषदेच्या ६ सदस्यांची मुदत संपत आहे. या सदस्यांच्या मतदारसंघात राज्य निवडणूक आयोगाने विधानपरिषदेची निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईतून शिवसेना नेते रामदास कदम यांचा देखील समावेश आहे. रामदास कदम यांना मंत्रिपदापासून डावललं असल्यामुळे ते शिवसेनेत गेल्या काही महिन्यांपासून नाराज झाले आहेत. नाराजीमुळे कदम यांनीच शिवसेनेतील नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टबाबतची माहिती माजी खासदार किरीट सोमय्या यांना दिली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे रामदास कदम यांना पुन्हा उमेदवारीची संधी देण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शिवसेना नेते रामदास कदम हे सध्या विधानपरिषदेचे सदस्य आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवारी २०२२ रोजी कदम यांच्या आमदारकीची मुदत संपत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता दुसऱ्याला संधी मिळणार का रामदास कदम यांनाच पुन्हा संधी देण्यात येणार यावरुन शिवसेनेत चर्चा सुरु झाली आहे. रामदास कदम यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचे वृत्त अलिकडे वेगाने पसरत होते. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना दिलेल्या माहितीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टबद्दलची माहिती माजी खासदार किरीट सोमय्या यांना दिल्याचा आरोप रामदास कदम यांच्यावर करण्यात आली आहे. रामदास कदम आणि आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यातील एक संभाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये रामदास कदम यांचा आवाज असून त्यात अनिल परब आणि सोमय्या यांच्या नावाचा उल्लेख आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचे समजते आहे.

शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर?

शिवसेना ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या आवाजाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेना पक्षाची बदनामी झाली असल्याचे मत काही शिवसैनिकांनी व्यक्त केलं आहे. रामदास कदम यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या काही दिवसांमध्ये कारवाई करतील असे सांगण्यात येत होते परंतु अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री रामदास कदम यांना पुन्हा संधी देतील का? की युवासैनिकाला संधी देण्यात येईल याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisement -

वरुण सरदेसाईंची संधी हुकणार

युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जातात. तसेच ते ठाकरेंचे नातेवाईक असल्यामुळे त्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु वरुण सरदेसाई यांची वयोमर्यादा बसत नसल्यामुळे त्यांची संधी हुकली आहे. परंतु आदित्य शिरोडकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

असं आहे निवडणुकीचे वेळापत्रक

राज्य निवडणूक आयोगाकडून १६ नोव्हेंबर २०२१ रोजी नोटीफिकेशन काढण्यात येईल.
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत असेल.
उमेदवारी अर्ज पडताळणी २४ नोव्हेंबरपर्यंत करण्यात येईल.
उमेदवाराला अर्ज मागे घ्यायचा असल्यास २६ नोव्हेंबरपर्यंत घेऊ शकतो.
विधानपरिषदेसाठी १० डिसेंबरला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळात मतदान घेण्यात येईल.
मत मोजणी १४ डिसेंबरला करण्यात येऊन निकाल जाहीर करण्यात येईल.


हेही वाचा : ९३च्या बॉम्ब स्फोटातील आरोपींकडून मलिकांनी कवडीमोल भावात घेतली जमीन, फडणवीसांचा दिवाळीनंतरचा धमाका

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -