MLC election: यंदाची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार ? काय म्हणाले चंद्रकांत पाटील

MLC election chandrakant patil comment on unopposed mlc election
MLC election: विधानपरिषदेच्या जागा बिनविरोध करण्याचा प्रस्ताव आल्यास विचार करु, चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

राज्यात विधानपरिषदेच्या ६ जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुका बिनविरोध होणार असल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिले. राज्यातील ६ जागांवर बिनविरोध निवडीचा प्रस्ताव आल्यास त्यावर चर्चा करु असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पाटलांच्या या वक्तव्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रस्ताव पाठवण्यात येणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. भाजपसह काँग्रेसही बिनविरोध निवडीसाठी अनुकूल असल्याचे बोलले जात आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, राज्यसभेची एक जागा काँग्रेसचे राजीव सातव गेल्यामुळे रिकामी झाली होती. भाजपकडून मुंबईचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली होती. अनेकवेळा काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब ठाकरे यांनी फोन केला होता. त्यांना सांगितले की सगळे निर्णय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारुन घेतो त्यानुसार फडणवीसांसोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात आला. तसेच काँग्रेसचे नेते शरद रणपीसे यांचे निधन झाले. त्यांच्या जागी भाजपकडून औरंगाबादचे अध्यक्ष संजय केणेकर यांना उमेदवारी दिली. पण पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना साकडं घातलं. ही जागा भावनिक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार प्रज्ञा सातव यांना बिनविरोध निवडून दिलं असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मात्र अशाप्रकारे विधानपरिषदेच्या ६ जागांवर बिनविरोध निवडणुकीचा कोणताही प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आल्यावर नेहमीप्रमाणेच सांगेल की देवेंद्र फडणवीस आणि सर्व नेत्यांशी बोलून ठरवू असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड

काँग्रेसकडून विधानपरिषदेवर उमेदवारी देण्यात आलेल्या प्रज्ञा सातव बिनविरोध निवडून आल्या आहेत. खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर रजनी पाटील यांना संधी देण्यात आली होती. तर प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे. भाजपने प्रज्ञा सातव यांच्याविरोधात औरंगाबादचे भाजप अध्यक्ष संजय केणेकर यांना उमेदवारी दिली होती. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. भाजपकडून केणेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड झाली आहे.


हेही वाचा :  Sangli District Bank Elections: सांगलीत भाजपला जबर धक्का, महाविकास आघाडीची एकहाती सत्ता