कोकणात शेकापचा बालेकिल्ला ढासळला, भाजपाचं कमळ फुललं; बाळाराम पाटील यांचा पराभव

या मतदारसंघात बाळाराम पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा असूनही यश मिळवू शकले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीला हा पराभव म्हणजे मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.

bjps dnyaneshwar mhatre win in teachers constituency
एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या आणि नंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाव निर्माण केलेल्या कोकणात आता भाजपने मुसंडी मारली आहे.

Maharashtra Legislative Council Election Result 2023 : गोव्याच्या सीमेपासून (सिंधुदूर्ग) थेट गुजरातच्या सीमेपर्यंत (पालघर) विस्तारलेल्या कोकण शिक्षक विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीत राज्याच्या राजकारणात एकेकाळी महत्त्वाची भूमिका बजाविलेल्या शेकापला मोठा धक्का बसलाय. कोकण शिक्षक विधान परिषद मतदारसंघाचा निकाल हाती लागलाय.

एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या आणि नंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाव निर्माण केलेल्या कोकणात आता भाजपने मुसंडी मारली आहे. या निकालाने कोकणात राजकीय चेहराच बदलला आहे. कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. या मतदारसंघात बाळाराम पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा असूनही यश मिळवू शकले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीला हा पराभव म्हणजे मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.

 

दोन केंद्रीय मंत्री, चार आमदार आणि चार खासदार रिंगणात उतरले तरीही पराभूत

भाजचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २३ हजाराहून अधिक मतं मिळाली आहेत. पहिल्या फेरीतच त्यांना ६० टक्के मत मिळाल्यानंतर त्यांची घोडदौड विजयाच्या दिशेने सुरू झाली होती. याच पहिल्या फेरीत शेकापचे बाळाराम पाटील यांना केवल ४० टक्केच मतं मिळाली असून शेकापचा बालेकिल्ला पुरता ढासळला आहे. विशेष म्हणजे बाळाराम पाटील यांना एकूण २३ संघटनांनी पाठिंबा सुद्धा दिला होता. इतकंच नव्हे तर दोन केंद्रीय मंत्री, चार आमदार आणि चार खासदार यांनी बाळाराम पाटील यांच्यासाठी रिंगणात उतरले होते. तरीही बाळाराम पाटील यांच्या पारड्यात अपयश पडल्याने इथल्या चर्चांना उधाण आलंय.

कोकणात शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव दीर्घ काळ होता. गेली कित्येक वर्षे काँग्रेसचीही मोठी ताकद या जिल्ह्यात होती. रायगडचे बॅ. ए. आर. अंतुले यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सुनील तटकरे यांनी या ठिकाणी आपला प्रभाव निर्माण केला. आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री म्हणून काम करीत असताना तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात घडाळ्याचे काटे फिरवले. त्याचबरोबरीने शिवसेनेची ताकद देखील रायगडमध्ये वाढली. मात्र इतर पक्षाच्या तुलनेने भारतीय जनता पक्षाचे रायगडमध्ये फारसे अस्तित्व नव्हते. पनवेल व उरण शहरात थोडीफार ताकद होती. परंतु इथे कमळ फारसं दिसत नव्हतं. अशा परिस्थितीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बाळाराम पाटील यांना शह दिला, ही उल्लेखनीय बाब आहे.

 

विजयानंतर भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले की….

नेरूळ इथल्या आगरी कोळी भवन इथे ही मतमोजणी झाली. कोकण शिक्षक मतदार संघात विजय मिळवल्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, “कोकण मतदारसंघातील शिक्षकांच्या एकजुटीमुळे हा विजय झाला आहे. त्यामुळे या सर्वांचे आभार म्हात्रे यांनी यावेळी मानले. या मतदारसंघात आजपर्यंत फक्त शिक्षक आमदार झाले आहेत. तीच परंपरा शिक्षकांनी राखल्याचा दावा म्हात्रे यांच्या बंधूंनी विजयानंतर केला आहे.”

पाहा काय म्हणाले ज्ञानेश्वर म्हात्रे ?

तर पराभूत ठरलेले शेकापचे बाळाराम पाटील म्हणाले की, “कोकणच्या शिक्षकांचा कौल खुल्या दिलानं मान्य आहे. तसेच आलेला निकाल मान्य करून पुढे मार्गक्रमण करण्याचा विचार आहे.” असं म्हणत त्यांनी निवडणुकीसाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार व्यक्त केले. मात्र कोकणात भाजपं कमळ फुलल्याने भाजपमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे.