नवी मुंबई : ज्ञानेश्वर जाधव
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरणार्या ‘ऐरोली-कटाई’ उन्नत मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या उन्नत मार्गातील पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील कामाने वेग घेतला आहे. एमएमआरडीए क्षेत्राला विद्युतपुरवठा करणार्या ऐरोली पोस्ट कार्यालयाजवळील दुसर्या उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीचे (टॉवर) काम ७ जानेवारीपर्यंत पूर्ण केले जाईल. उन्नत मार्गाच्या दोन्ही टप्प्यातील ७५ टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएने कंबर कसली आहे. त्यामुळे नव्या वर्षात नवी फ्री-वे प्रवासासाठी मोकळा होणार आहे.
ऐरोली ते डोंबिवलीजवळील कटाई नाक्यापर्यंतचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण करण्यासाठी पारसिक डोंगरातून भुयारी मार्ग काढण्यात आला आहे. मे २०१८ मध्ये ऐरोली-काटई उन्नत मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यामध्ये ठाणे-बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ हा ३.४३ किमीचा मार्ग बनवणे आणि दुसरा टप्पा ऐरोली पुलापासून ठाणे-बेलापूर मार्गावरील भारत बिजलीपर्यंत जोड रस्ता या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. कोरोनाचा कालावधीत रखडलेले काम त्याच बरोबरच सिडको आणि वनविभाग, सीआरझेड झोन परवानगी, रेल्वे ट्रॅकमुळे गर्डर टाकण्यास थांबलेली परवानगी, महावितरणची उच्च दाबाची विद्युत वाहिनी टाकणे, वृक्षछाटणी परवाना, खाडी-पूल विभागाचा परवाना अशा अनेक प्राधिकृत परवान्यांची कसरत पूर्ण करत ऐरोली-कटाई उन्नत मार्ग अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे.
हेही वाचा…Happy New Year : स्वागत नववर्षाचे…या देशाने केले प्रथम स्वागत
दरम्यान ऐरोली-कटाईच्या मार्गाच्या ३० डिसेंबर २०२४ पर्यंतच्या कामाचा आढावा घेतला असता यातील ७५ टक्के काम पूर्ण करण्यात एमएमआरडीएला यश आले आहे. रेल्वे बोर्डाकडून ब्लॉक मिळाल्यानंतर ऐरोली रेल्वे स्थानकाजवळ गर्डर टाकणे आणि विद्युत टॉवरचे काम पूर्ण झाल्यानंतर ऐरोली खाडी पूल ते ऐरोली रेल्वे स्टेशनपर्यंत उर्वरीत ठिकाणी कॉलम टाकण्यात येणार आहे. त्यामुळे सहा वर्षांनंतर २०२५ मध्ये अर्थात नवीन वर्षात या फ्री-वेवरुन मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांना प्रवास करता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा…CM Fadnavis : जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
नवी मुंबईकरांसाठी स्वतंत्र जोड मार्गिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सीमेन्स कंपनीजवळील दोन मार्गाचे कामदेखील दिवाळीपर्यंत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. सध्या प्रवाशांना मुंब्रा-शिळफाटा किंवा महापे मार्गे पर्यायी मार्गाने जावे लागते. मुंबई, नवी मुंबईबरोबरच उल्हासनगर, अंबरनाथ, डोंबिवली, विठ्ठलवाडी आणि बदलापूरसह कल्याण आणि आसपासच्या वाढत्या लोकसंख्येच्या सोयीसाठी ऐरोली-काटई नाका प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते डोंबिवलीकडे जाण्यासाठी कटाई नाका असा १५ ते २० मिनिटांचा वाहतूककोंडीमुक्त प्रवास नव्या वर्षात करता येणार आहे.
प्रकल्पाचे ठळक मुद्दे
१. मुंब्रा शिळफाटा दरम्यान ६३ मीटर लांबीचे स्टीलचे ८ गर्डर
२. मुंबई व नवी मुंबईला कल्याण-डोंबिवलीसह भिवंडी आणि अंबरनाथ-बदलापूरला जोडणार
३. नवी मुंबईकरांसाठी स्वतंत्र जोड मार्गिका
४. ऐरोली पूल ते ठाणे-बेलापूर २.६० किलोमीटरचा रस्ता
५. १.६९ किमी लांबीचा दुहेरी बोगदा व एक उन्नत रस्ता
६. १५ ते २० मिनिटांचा वाहतूककोंडीमुक्त प्रवास