जनतेवर दादागिरीचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतीलच, मनसेचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर

Mns Amey Khopkar hit back nawab malik on maharashtra bandh
जनतेवर दादागिरीचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतीलच, मनसेचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर

महाविकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खीरी प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. परंतु राज्यातील विरोधी पक्ष भाजपने महाराष्ट्र बंदला विरोध करुन शेतकऱ्यांच्या हत्येला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासोबत मनसेकडूनही महाराष्ट्र बंदला विरोध करण्यात येत आहे. बंदला विरोध करुन मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहेत का? असा सवाल अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मलिकांच्या प्रश्नावर मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राज्य सरकारला एवढाच शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर त्यांनी एका महिन्याचे वेतन आंदोलनासाठी पाठवावे. जनतेवर दादागिरीचे परिणाम भोगायला लागतील असे मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र बंदला मनसेनं विरोध केल्यामुळे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मनसेकडून जोरदार टीका करण्यात आली होती. नवाब मलिक यांच्या टीकेवर मनसे नेते अमेय खोपकर यांनी खोचक शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. जनतेच्या जीवाशी खेळ करुन राजकारणाची पोळी भाजणारी महाभकास आघाडी आहे. लखीमपुरमधील घटना दुर्दैवी असून त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. ठाकरे सरकार बंद ठेवून काय साध्य करत आहे. गाड्यांची तोडफोड, जबरदस्ती करुन दुकानं बंद करायला लावणारी ही गुंडशाही उरावर बसलेय? असा सवाल अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे.

नवाब मलिक काय म्हणाले ?

भाजपच्या व्यापार संघटना बोटावर मोजण्यासारखे आहेत. सर्व मोठ्या व्यापारी संघटना, राज्यातील व्यापारी यांनी पाठिंबा दिल्यामुळे हा महाराष्ट्र बंद यशस्वी झाला आहे. लोकं बंद पुकारल्यानंतर समोर येऊन पाठिंबा देत आहेत. याचा अर्थ बंदला पाठिंबा आहे. महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मनसे विरोध करुन शेतकऱ्यांच्या हत्येला पाठिंबा देत आहे का? असा सावल अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

महाराष्ट्र बंद राजकीय पोळी भाजण्यासाठी

लखीपुर खीरीतील घटना दुर्दैवी आहे परंतु हा बंद संवेदना दाखवण्यासाठी नाही तर राजकीय पोळी भाजता येईल का या विचाराने केलेला हा बंद असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या बंदला प्रतिसाद नाही मात्र प्रशासनाची मदत घेऊन, दमदाटी करुन पोलीस प्रशासन, जीएसटी प्रशासन या सगळ्याचा वापर करुन लोकांना बंद ठेवण्यासाटी प्रवृत्त केलं जात असल्याचे सांगत फडणवीसांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. या सरकारमध्ये तीच लोकं आहेत ज्या लोकांनी मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. या गोळीबार करणाऱ्या सरकारला नैतिकता आहे का आंदोलन करण्याची असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


हेही वाचा : Maharashtra Band : हा बंद म्हणजे सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद – फडणवीस