घरताज्या घडामोडीमनसेने फोडली निषेधाची दहीहंडी

मनसेने फोडली निषेधाची दहीहंडी

Subscribe

दहीहंडी उत्सवावरून मनसे आक्रमक झाली आहे. हिंदू आणि मराठी सणांनाच कोरोनामुळे बंदी का ? असा सवाल करत आम्ही दहीहंडी साजरा करणारच असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. त्यानूसार आज नाशिक मनसेच्यावतीने दहीहंडी उत्सव साजरा करत शासनाचा निषेध नोंदवला.

कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला असला तरी, संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सवांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच गर्दी न करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. मात्र दोन दिवसांपूर्वीच नाशिक दौर्‍यावर आलेले मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दहीहंडी उत्सवावरून शासनावर शरसंधान साधले. जन आशिर्वाद यात्रा आणि आंदोलनावेळी कोरोना नसतो का ? असा सवाल करत आम्ही दहीहंडी साजरी करणारच, असा इशाराही देण्यात आला. तिसरी लाट येणार याचा तुमच्याकडे पुरावा काय ? हिंदू आणि मराठी सणांनाच बंदी का ? असाही सवाल देशपांडे यांनी व्यक्त केला. त्यामुळे दहीहंडी उत्सवावरून मनसे आक्रमक झाली असून, मनसेच्यावतीने राजगड येथील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकत्रित येत दहीहंडी उत्सव साजरा केला. या वेळी हिंदू विरोधी बिघाडी सरकारचा निषेध, या बिघाडी सरकारचे करायचे काय ? खाली डोके वरती पाय, हरे राम हरे कृष्णा अशा घोषणा देत हिंदू विरोधी बिघाडी सरकारच्या नावाची हंडी फोडण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे, सरचिटणीस निखील सरपोतदार, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जावेद शेख, शहर संघटक अमित गांगुर्डे, विजय ठाकरे, मनविसे जिल्हाध्यक्ष कौशल पाटील, अरुण दातीर, सौरभ सोनवणे, तुषार भंदुरे, विकी बिर्‍हाडे, नरेश भोंगे, भूषण सूर्यवंशी आदी पदाधिकारी , कार्यकर्ते सहभागी झाले होते.

- Advertisement -

देशातील इतर ठिकाणची मंदिरे उघडलेली असतांना राज्यातील मंदिरे मात्र अजूनही बंदच आहेत. पवित्र श्रावण मासातही हिंदू बांधवांना देव दर्शनास मज्जाव करण्यात आला. आता कृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर दरसाल होणार्‍या दही हंडी उत्सवावर बंदी घालून राज्य सरकारने कृष्ण भक्तांच्या उत्साहावर विरजण घातले आहे. आघाडी सरकारच्या या हिंदू विरोधी धोरणाचा निषेध मनसेच्यावतीने आम्ही निषेध करीत आहोत.
मनोज घोडके, उपाध्यक्ष, मनसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -