कार्यकर्त्यांनो १४ तारखेला भेटायला येऊ नका, वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

Doctors advise Raj Thackeray to rest

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा १४ जुलै रोजी ५४ वा वाढदिवस आहे. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो कार्यकर्ते त्यांना भेटायला निवासस्थानी येतात. तसेच त्यांना मनापासून शुभेच्छा देतात. मोठ्या जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. पण यंदाच्या वर्षी राज ठाकरे आजारी आहेत. मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नाहीये. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी मनसैनिकांना आवाहन केलं आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनो १४ तारखेला भेटायला येऊ नये, जिथे आहात तिथून शुभेच्छा द्यावात, असं आवाहन राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसैनिकांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना केलं आहे.

ऑडियो पोस्टमधून काय केलंय आवाहन ?

माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, त्यादिवशी पुण्याला जी सभा झाली आपली, त्या पुण्याच्या सभेत मी आपणाला सर्वांना सांगितलं की, माझी शस्त्रक्रिया करायची आहे. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालो, त्यानंतर सगळ्या टेस्ट झाल्या आणि रात्री मला डॉक्टरांनी सांगितलं की, कोव्हिडचा डेड सेल आहे. ते काय असतं हे मलाही नाही माहिती आणि कोणालाच नाही माहिती असो. त्यामुळे माझी शस्त्रक्रिया रद्द झाली. आता परत करायचं, त्यानंतर मी एक १०-१२ दिवस कोव्हिडच्या नियमांप्रमाणे घरातच क्वॉरंटाईन आहे. त्या सगळ्या दरम्यान १४ तारखेला माझा वाढदिवस आहे. आपण सर्वजण दरवर्षी माझ्या वाढदिवसाला प्रेमाने आणि उत्साहाने माझ्याकडे भेटायला येता. मी सुद्धा आपल्या सर्वांची आतुरतेने वाट पाहतो. सर्वांना भेटल्यावर बरंही वाटतं, असं राज ठाकरे म्हणाले.

पण, यावर्षी मला १४ तारखेला वाढदिवसाला कोणालाही भेटता येणार नाही. याचं कारण म्हणजे त्या गाठीभेटीत परत जर संसर्ग झाला तर त्यातून मला परत जर शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली तर मी ती किती पुढे ढकलायची यालाही मर्यादा असते. त्यामुळे पुढल्या आठवड्यात माझी शस्त्रक्रिया ठरलेली आहे, त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचा धोका पत्करु इच्छित नाही. म्हणून मी १४ तारखेला कुणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाली होती. तसेच पायाच्या आजाराने त्रस्त असल्यामुळे राज ठाकरे शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता दोन दिवसांवरच त्यांचा वाढदिवस असल्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक खबरदारी म्हणून राज ठाकरेंनी वाढदिवसानिमित्त ऑडिओच्या माध्यमातून मनसैनिकांना आवाहन केलं आहे.


हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांमुळे विजय सुखकर झाला, आठ वर्षांनी गुलाल लागताच धनंजय महाडिकांची प्रतिक्रिया