राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची नवीन तारीख ठरली, गणेश कला क्रीडा मंच येथे होणार सभा

अयोध्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर मंगळवार १७ मे पासून होते. मात्र, मंगळवारी रात्री त्यांना दौरा अर्धवट ठेवून मुंबईला परतावे लागले होते.  

Raj Thakrey

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची नवीन तारीख आता ठरली आहे. याआधी त्यांची सभा २१ मे रोजी होणार होती. मात्र, महत्त्वाच्या कामासाठी पुण्याचा दौरा अर्धवट ठेवून राज ठाकरे मुंबईला परतले. त्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे पुण्यात त्यांची सभा होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

राज ठाकरे यांची पुण्यातील सभा आता रविवारी २२ मे रोजी होणार आहे. ही सभा गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी दहा वाजता होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अयोध्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर मंगळवार १७ मे पासून होते. मात्र, मंगळवारी रात्री त्यांना दौरा अर्धवट ठेवून मुंबईला परतावे लागले होते. त्यांची सभा २१ मे रोजी मुठा नदी पात्रातील मैदानात होणार होती. मात्र हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडण्याची शक्यता होती. पाऊस आला तर हजारो लोकांना त्रास होईल. यामुळे 21 ऐवजी 22 मे रोजी गणेश कला क्रीडा मंच इथे सकाळी दहा वाजता सभा घेण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे.

मंगळवारी रात्री बाजीराव रोडवरील अक्षरधारा बुक गॅलरी येथून त्यांनी पुस्तकांची खरेदी केली. त्यानंतर अचानक ते मुंबईला परतले. अक्षरधारा बुक गॅलरीत राज ठाकरे गेले तेव्हा त्यांच्या मागावर असलेले प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही तिथे पोहचले. त्यांना पाहून राज ठाकरे संतपाले होते.  राज यांनी ‘काही जगू द्याल की नाही?’ असे म्हणत पत्रकारांना कॅमेरे बंद करायला लावले. रात्री आठ वाजण्याच्या ते अक्षरधारा बुक गॅलरीत दाखल झाले होते. त्यानंतर दीड तास त्यांनी पुस्तकांच्या सानिध्यात घालवला.

राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. उत्तर प्रदेशचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून जोपर्यंत राज उत्तर भारतीयांची माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांना उत्तर प्रदेशच्या जमिनीवर पाऊल टाकू न देण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे पुण्यातील सभेत याबाबत राज ठाकरे काय बोलतात याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.