Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र काय आहे राज ठाकरेंच्या या बदलत्या स्वरूपाचा 'राज'!

काय आहे राज ठाकरेंच्या या बदलत्या स्वरूपाचा ‘राज’!

राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये राज ठाकरेंचं बदललेलं रूप पाहायला मिळत आहे.

Related Story

- Advertisement -

‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना वेळ देत नाहीत, भेटत नाहीत’ असा आरोप अनेकदा त्यांच्यावर झालाय. तसेच राज ठाकरेंच्या याच स्वभावामुळे त्यांच्या अनेक साथीदारांनी मनसेला जय महाराष्ट्र करत दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याचंही बोललं गेलं. या सगळ्याचा फटका मनसेला २०१४ च्या विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका तसंच नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बसला होता. मात्र आता याच ब्रेक लागलेल्या इंजिनाला गती देण्यासाठी इंजिनाचे प्रमुख राज ठाकरे स्वतः आता रस्त्यावर उरतले आहेत. राज ठाकरे नुसतेच रस्त्यावर उतरले नाहीत, तर त्यांनी स्वतःमध्येही मोठा बदल केल्याचे देखील पाहायला मिळत आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकांसाठी पक्षातल्या बदलांना राज ठाकरेंनी स्वत:पासूनच सुरुवात केल्याचं मत राजकीय क्षेत्रातले जाणकार व्यक्त करत आहेत.


या भेटीबद्दल तुम्हाला माहितीये का? – शरद पवार – राज ठाकरेंच्या ‘विमान भेटी’त काय बोलणं झालं?


विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंचं वेगळं रूप!

- Advertisement -

सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून राज ठाकरेंचं एक वेगळं रूप या दौऱ्यात पाहायला मिळत आहे. याआधी कधीही या आपल्या नेत्याच्या जवळ जाता न येणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना आता चक्क राज ठाकरे यांच्यासोबत बसण्याची संधी मिळत आहे. नुसतीच संधी नाही, तर राज ठाकरे चक्क या कार्यकर्त्यांच्या घरी त्यांच्या मांडीला मांडी लावून जेवताना देखील पहायला मिळत आहेत!

ढाब्यावरही घेतले जेवण!

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे हे मंगळवारी ढाब्यावर जेवतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. मंगळवारी दुपारी वाशिमहून अकोल्याला जाताना मधे चक्क एका ढाब्यावर राज ठाकरेंनी पेटपूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर आणि मनसेचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित असल्याचं फोटोमधून दिसतंय.

विदर्भ दौऱ्यासाठी खास रेल्वेचा प्रवास

- Advertisement -

याशिवाय राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यासाठी खास रेल्वेने प्रवास केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांना बघण्यासाठी सीएसएमटी स्टेशनवर कार्यकर्त्यांची एकच गर्दी पाहायला मिळाली. राज ठाकरेंच्या या रेल्वे प्रवासादरम्यानचे फोटो देखील सोशल मीडियावर चांगलेच चर्चिले जात होते.

संघटना वाढवण्याचा प्रयत्न

दरम्यान, याआधी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेल्या कुंतल या गावात ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव यांच्या घरी खाली बसून राज ठाकरे जेवत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. रवी जाधव यांचे घर आदिवसी पाड्यात आहे. तिथे जाऊन रवी जाधव यांची भेट घेऊन राज ठाकरे जेवले होते. त्यावेळी देखील त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर आणि तर मनसेचे इतर नेते होते. तसेच काही दिवसांपूर्वी नाशिकमधील मनसैनिकांना राज ठाकरे यांच्या साधेपणाचा अनुभव आला होता. त्यावेळी राज यांनी जमिनीवर बसून कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. मात्र आता तर संपूर्ण विदर्भ दौऱ्यातच राज ठाकरे आपल्या या वेगळ्या शैलीने सगळ्या कार्यकर्त्यांना जोडून संघटना वाढवताना दिसत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या नव्या बदलाचा पक्षाला येत्या निवडणुकीत काय फायदा होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -