बुडाला औरांग्या पापी म्लेंछसंव्हार जाहाला..,पुण्यात राज ठाकरेंच्या सभेचा पोस्टर जारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादनंतर आता २२ मे रोजी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. अयोध्या दौऱ्याअगोदर राज ठाकरेंची पुण्यात महत्त्वाची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. परंतु ठाकरेंच्या जाहीर सभेपूर्वी त्यांचं हिंदूजननायक असं पोस्टर पुण्यातून समोर आलं आहे. बुडाला औरंग्या पापी म्हणत भगव्या रंगात न्हाऊन निघालेलं पोस्टर तसेच त्या पोस्टरवर राज ठाकरेंचा उल्लेख हिंदूजननायक म्हणून केला आहे.

राज ठाकरे यांच्या सभेआधी पोस्टर किंवा सभेचा ट्रेलर लॉन्च करण्यात येतो. सभेला दोन दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरे यांच्या सभेचं पोस्टर समोर आलं आहे. तसेच राज ठाकरे यांचा हिंदूजननायक असा उल्लेख देखील करण्यात आला आहे.

सभेच्या पोस्टरवर काय लिहिलंय?

बुडाला औरांग्या पापी! म्लेंछसंव्हार जाहाला!
मोडली मांडली छेत्रें! आनंदवनभुवनी!!, असं पोस्टरवर लिहिलं आहे. तसेच राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक असा केला आहे. त्याचप्रमाणे जाहीर सभेची वेळ, ठिकाण आणि सभा कधी होणार याची तारीख देखील लिहिण्यात आली आहे.

राज ठाकरे यांची पुण्यातील सभा येत्या रविवारी २२ मे रोजी होणार आहे. ही सभा गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. राज ठाकरे आपला दोन दिवसीय पुणे दौरा संपवून कालच मुंबईमध्ये आले. आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांची पुण्याच्या जाहीर सभेबाबत चर्चा झाली.

राज ठाकरेंची सभा २१ मे रोजी मुठा नदी पात्रातील मैदानात होणार होती. मात्र हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पाऊस आला तर हजारो लोकांना त्रास होईल. यामुळे २१ ऐवजी २२ मे रोजी गणेश कला क्रीडा मंच इथे सकाळी दहा वाजता सभा घेण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे.


हेही वाचा : राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची नवीन तारीख ठरली, गणेश कला क्रीडा मंच येथे होणार सभा