“मला उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याच्या ठरावाचा पश्चाताप…”; राज ठाकरेंनी स्पष्ट केले शिवसेना फुटण्याचे कारण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही बंडखोरांवर टीका करत गद्दार म्हटले. राज्यातील या सगळ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.

MNS gajanan kale attack cm uddhav thackeray

बंडाळीनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या गटाने भारतीय जनता पार्टी पक्षाशी युती करत राज्यात शिंदे गट आणि भाजापाचे सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्यातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही बंडखोरांवर टीका करत गद्दार म्हटले. राज्यातील या सगळ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेच्या इतिहासावर भाष्य केले असून, बंडाचे कारण उद्धव ठाकरेचे असल्याचे म्हटले. शिवाय, राज ठाकरे यांनी आमदारांच्या बंडांचे श्रेय उद्धव ठाकरेंना दिले. (mns chief raj thackeray slam shivsena chief uddhav thackeray on rebel mla)

झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांना महाबळेश्वर अधिवेशनात उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याच्या ठरावाचा पश्चाताप वाटतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्या ठरावावर कोणताही पश्चाताप होत नसल्याचे म्हटले. शिवसेनेच्या महाबळेश्वरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांना पक्षाचा कार्याध्यक्ष करण्याचा ठराव राज ठाकरे यांनी मांडला होता. तसेच, “शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची असून, उद्धव हे बाळासाहेबांचं अपत्य आहे. त्या संपूर्ण काळात बाळासाहेबांच्या मनात काय चालले होते हे मला जाणवत होते. राजकारणात अशा गोष्टी सांगितलेल्या अनेकांना पटत नाही किंवा पचत नाहीत. परंतु, तेव्हा माझ्या मनात कधीही शिवसेनेचा प्रमुख व्हावे, अध्यक्ष व्हावे असे वाटत नव्हते”, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

शिवसेनेचा इतिहास सांगताना राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. त्यानुसार, “त्यावेळी मी अनेकदा बाळासाहेबांना याबाबत पत्रंही लिहिली होती. मी त्या काळातही पक्षात माझी जबाबदारी काय ही एकच गोष्ट विचारत होतो. तुम्ही इतरांवर सगळ्या जबाबदाऱ्या टाकता. परंतु, मला केवळ निवडणुकीत भाषणासाठी बाहेर काढता. त्यावेळी ही अशी स्थिती शिवसेनेत होती. मी भाषण देतो तेव्हा मी त्या विषयावर पूर्ण स्पष्टतेने बोलत असतो. मी बोलल्यानंतर जर ती गोष्ट झाली नाही तर पुढच्या वेळी त्या लोकांसमोर जाऊन मी काय भाषण करायचे. मी दुसऱ्यांच्या जीवावर माझा शब्द टाकत बसायचा. हे शक्य नव्हतं” असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे अध्यक्षपद कोणाकडे असणार या प्रश्नाचेही उत्तर त्यांनी दिले. “अध्यक्षपदाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंचा निर्णय होता. मी बाळासाहेब ठाकरे यांना महाबळेश्वराला सांगितलं की, काका तुझ्या मनात काय आहे हे मला माहिती आहे. आम्ही एकमेकांना आरे-कारे बोलायचो. मी त्यांना सांगितलं की तुम्ही उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करा, मी जाहीर करेन. म्हणजे राज की उद्धव हा विषय बंद होईल. सर्व बातम्या माझ्या आणि उद्धव ठाकरेंच्या नावाने येत असतील तर मीच विषय बंद करतो. त्यामुळे त्यावर पश्चाताप होत नाही”, असे त्यांनी सांगितले.

“बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्रप्रेमापोटी शिवसेना फुटली. याला दुसरे कोणतेच कारण नव्हते. तुमची वागणूक, सगळ्या गोष्टी पैशात मोजायच्या, पैशात तोलायच्या. पक्षाकडे बघायचे नाही, लक्ष द्यायचे नाही”, असे आरोप करत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. त्याशिवाय, “आजही सगळे लोक काय सांगत आहेत? लोक म्हणतात आज जे सुरू आहे त्यात उद्धव ठाकरेंना सहानुभुती मिळत आहे. मला हे कळालं नाही. यात सहानुभुतीचा काय संबंध?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा होता आणि तो पक्ष बाळासाहेबांसोबत गेला. आत्ताच्या शिवसेनेत बाळासाहेबांचा विचारही नाही. आजच्या पक्षप्रमुखांच्या अंगावर मराठी किंवा हिंदुत्वाच्या नावाने एक खटला तरी दाखल आहे का? त्या विषयावर मोर्चा काढला, आंदोलन केले असे काहीच नाही. त्यांची इतकी भाषणे ऐकलीत तर बाळासाहेबांच्या तोंडातील दोन-चार वाक्य सोडली तर त्यांनी काय हिंदुत्व मांडलंय मला सांगावे”, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.


हेही वाचा – मुंबईला दोन वर्षात खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन