आमची परवानगी घेतल्याशिवाय महाराष्ट्रात येता येणार नाही; राज ठाकरेंचा योगींना टोला

RAJ Thackeray and UP cm Yogi
मनसे प्रमुख राज ठाकरेंचे योगींना उत्तर

लॉकडाऊनमुळे देशभरातील राज्यातून उत्तर प्रदेश आणि बिहारचे कामगार मोठ्या प्रमाणात स्वराज्यात परतले आहेत. उत्तर प्रदेशने आता मायग्रेशन कमिशन स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच आता इतर राज्यांना उत्तर प्रदेशमधील कामगार हवे असल्यास त्या राज्याची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते. त्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी योगींना जशासतसे उत्तर दिले आहे. “कामगारांसाठी उत्तर प्रदेशची परवानगी घ्यायची असेल तर मग महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही, हे ही योगी आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं”, असे प्रत्युत्तर राज ठाकरेंनी दिले आहे.

आज योगी आदित्यनाथ यांनी मायग्रेशन कमिशनची स्थापना करणार असल्याची घोषणा केली. तसेच यापुढे इतर राज्यातील उद्योगांना उत्तर प्रदेशच्या कामगारांची गरज भासल्यास राज्याची परवानगी घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी दोन ट्विट करत योगींचा समाचार घेतला. “यापुढे राज्य सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहावे. कामगार राज्यात आणताना त्यांची नोंद करावी. पोलीस स्टेशनमध्ये त्यांची ओळख आणि फोटो असले पाहीजेत. तरच त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रवेश द्यावा.”

या ट्विटनंतर राज ठाकरे पुढे म्हणाले की, “ते जर उत्तर प्रदेशचे कामगार असतील तर त्यांना फक्त उत्तर प्रदेशमध्येच मतदानाचा हक्क मिळेल. कारण कायद्यानं आपल्याकडे एका मतदाराला दोन ठिकाणी मतदान करता येत नाही ह्याची जाणीव मुख्यमंत्री आदित्यनाथांनी ठेवावी, महाराष्ट्रानं आणि देशातल्या इतर राज्यांनीही ठेवावी..”

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नावरुन सतत प्रतिक्रिया देत आहेत. उत्तर प्रदेश राज्यातून सर्वाधिक मजूर हे भारतभर अन्य राज्यात मजुरीसाठी जात असतात. या मजुरांना पुन्हा राज्यात घेण्यासाठी योगींनी सुरुवातील नकार दिला होता. त्यानंतर इतर राज्यांनी दबाव वाढविल्यानंतर त्यांना राज्यात घेण्यात आले होते. कालच त्यांनी ट्विटची मालिका करुन महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले होते.