पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपातीविरोधात मनसेचे हटके आंदोलन!

पिंपरी-चिंचवडमध्ये लागू करण्यात आलेल्या पाणीकपातीचा निषेध करण्यासाठी मनसे आणि काँग्रेसकडून हटके आंदोलन करण्यात आलं.

pimpri chinchwad protest

सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. सद्य स्थितीला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात तब्बल ९६ टक्के जल साठा उपलब्ध आहे. तरीही पिंपरी-चिंचवडकरांवर दिवसाआड पाणी भरण्याची वेळ आलेली आहे. याच कारणामुळे पालिका प्रशासनाच्या विरोधात सोमवारी राज्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाने हंडा मोर्चा काढला, तर मनसेने महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारावर रिकामे मडके फोडून पाणी कपातीचा निषेध केला. यावेळी महापौर माई ढोरे या प्रवेशद्वारावर मोटारीने येत होत्या, तेव्हा मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या मोटारीसमोर रिकामे मडके फोडले. यामुळे काही वेळ सुरक्षा रक्षकांची धावपळ झाली.

९६ टक्के पाणीसाठा असूनही कपात?

पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात सद्य स्थितीला ९६ टक्के पाणी साठा आहे. परंतु, महानगर पालिकेच्या आयुक्तांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे सांगितले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या मार्गदरखानाखाली महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला आला. यावेळी पालिकेतील सत्ताधारी भाजपविरोधात घोषणा देण्यात आल्या. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत पाणी कपात रद्द करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.