मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे केली होती. यानंतर आता मीरा-भाईंदरमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या मेट्रोच्या एलिवेटेड उड्डाणपूलाला भारतरत्न दिवंगत रतन टाटा यांचे नाव देण्याची मनसेकडून होताना दिसत आहे. यासाठी मनसेने मंत्रीमहोदयांना निवेदन दिले असून आज आंदोलनही केले. (MNS demands naming of elevated flyover in Mira-Bhayandar after late Ratan Tata)
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा एलिवेटेड उड्डाणपूल नव्याने बांधण्यात आला आहे. प्लेझंट पार्क, ब्रँड फॅक्टरी आणि साईबाबा नगरपर्यंत बांधण्यात आलेल्या मेट्रोच्या खालील उड्डाणपूलाला ‘रतन टाटा उड्डाणपूल’ असे नाव देण्याची मागणी मनसेने केली आहे. या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार नरेंद्र मेहता आणि मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे संजय काटकर यांना निवेदन दिले आहे. सदर उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले असले तरी अद्याप या उड्डाणपूलाला अद्याप अधिकृत नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे आज संदीप राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे कार्यकर्त्यांनी उड्डाणपूलाला रतन टाटा यांचे नाव देण्यासाठी आंदोलन केले.
हेही वाचा – Jayant Patil : हसत खेळत लोकांच्या टोप्या उडवणारा…; जितेंद्र आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट
आंदोलनावेळी माध्यमांशी संवाद साधताना संदीप राणे म्हणाले की, दिवंगत रतन टाटा यांनी देशासाठी आणि समाजासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रात मोठे योगदान केले असून, टाटा समूहाच्या माध्यमातून देशाच्या विकासात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची आठवण कायम राहावी म्हणून या पुलाला त्यांचे नाव देण्यात यावे. जर असे झाले तर रतन टाटा यांच्या अभूतपूर्व योगदानाचा सन्मान होईल. त्यामुळे त्यांच्या नावाने या उड्डाणपुलाचे नामकरण करावे, अशी मागणी आम्ही करत आहोत. मनसेच्या मागणीवर स्थानिक प्रशासन आणि शासन काय निर्णय घेतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा – Devendra Fadnavis : लोकशाहीमध्ये संवाद महत्त्वाचा, मुंडे-धस भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया