“ब्रिज”चे निर्माते म्हणत मनसेकडून पवार आणि बृजभूषण सिंहांचा फोटो ट्विट, राज ठाकरेंच्या दौऱ्याविरोधात रसद पुरवल्याचा आरोप

MNS Gajanan kale tweet sharad pawar and brijbhushan singh photo for raj thackeray ayodhya tour
"ब्रिज"चे निर्माते म्हणत मनसेकडून पवार आणि बृजभूषण सिंहांचा फोटो ट्विट, राज ठाकरेंच्या दौऱ्याविरोधात रसद पुरवल्याचा आरोप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविरोधात रसद पुरवली असल्याचा आरोप राष्ट्रवादीवर अप्रत्यक्षरित्या करण्यात येत आहे. पुण्यातील सभेत आपला दौरा रद्द करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरेंनी महाराष्ट्रातून दौऱ्याला विरोध करत उत्तर प्रदेशचे खासदार बृजभूषण सिंह यांना रसद पुरवली असल्याचा आरोप केला होता. यानंतर आता मनसे नेत्यांकडून बृजभूषण सिंह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. ब्रिजचे निर्माते असे मनसे नेते गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र डागलं आहे. तसेच बृजचे निर्माते असा आरोप त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. “ब्रिज” चे निर्माते … सुज्ञास अधिक सांगणे न लगे, आशा आशयाचे ट्विट गजानन काळे यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांचा बृजभूषण सिंह यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला आहे. तसेच हा फोटो झूम करुन पाहा असेही गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

महाराष्ट्रात चुकिचे पायंडे पडत आहेत. अयोध्या दौऱ्याविरोधात महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असल्याचे राज ठाकरे यांनी सुतोवाच केले आहेत. यानंतर हा फोटो सर्व काही सागंतो. शरद पवार यांच्यावर जेव्हा टीका करण्यात आली तेव्हा राज ठाकरेंनी सर्व मतभेद मनभेद बाजूला ठेवून पवारांना पाठींबा दिला होता. हे फोटो पाहता आपल्याला लक्षात येईल की आम्हाला नेमकं काय म्हणायचे आहे, असे मनसे नेते गजानन काळे यांनी म्हटलं आहे.

संदीप देशपांडेंची राष्ट्रवादीवर टीका 

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीसुद्धा ट्विट करुन राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांन विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे. असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले असून शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचा फोटो ट्विट केला आहे.


हेही वाचा : …अन् नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका