घरताज्या घडामोडीगणपतीला कोकणात जाताय ? मनसेने सुचवलाय 'हा' बायपास!

गणपतीला कोकणात जाताय ? मनसेने सुचवलाय ‘हा’ बायपास!

Subscribe

कोकणासह राज्यभरात गणेशोत्सवासाठी जाणार्‍या चाकरमान्यांना सवलतीच्या दरात एसटीच्या बसेस उपलब्ध करुन देण्याची मागणी परिवहण मंत्री अनिल परब यांच्याकडे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनला आता चार महिने होत आले असताना, लॉकडाउन अजूनही वाढविण्यात येत आहे. या कालावधीत मुंबई,ठाणे,पुण्यासह राज्यभरात राहणार्‍या चाकरमान्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे अथवा राज्य शासनाची परिवहन सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. याचा गैरफायदा घेऊन खाजगी ट्रॅव्हल्स कडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून सर्वसामान्यांची लूटमार सुरू आहे.  त्यातच जिल्हाबंदी मुळे इ-पास बंधनकारक केला आहे. हा पास सर्वसामान्य नागरिकांना सहज उपलब्ध होत नसून दलालांमार्फत उपलब्ध होतो. त्यातही सर्वांची राजरोसपणे लूटमार सुरू असून कुणीही याकडे लक्ष दयायला तयार नाही. या सर्वाचा आर्थिक भुर्दंड मात्र सर्वसामान्य चाकरमान्यांना बसत आहे.त्यामुळे कोकणासह राज्यभरात गणेशोत्सवासाठी जाणार्‍या चाकरमान्यांना सवलतीच्या दरात एसटीच्या बसेस उपलब्ध करुन देण्याची मागणी परिवहण मंत्री अनिल परब यांच्याकडे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

बस सेवा उपलब्ध करून द्या

राजू पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आता गणेशोत्सव तोंडावर आला आहे. कोकणात पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो व राज्यातील कानाकोपर्‍यात नोकरी, व्यवसायानिमित्त राहात असलेला चाकरमानी गणेशोत्सवासाठी आवर्जुन कोकणात जातो. दरवर्षी रेल्वे व बस सेवेसारखी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असल्याने त्याला जाण्यासाठी कोणतीही अडचण येत नव्हती. यावर्षी सध्याची परिस्थिती पाहता रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता वाटत नाही.अशा वेळी राज्यांतर्गत परिवहन सेवाही सुरू न झाल्यास अडचणी अधिक वाढणार आहेत. सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊनमुळे नोकर्‍या, व्यवसाय बंद असल्याने सर्व सामान्य नागरिक आधीच मेटाकुटीला आला आहे. त्यातच गावी जाण्यासाठी केवळ खाजगी वाहतुकीचा पर्याय राहिल्यास त्याचा आर्थिक भुर्दंड चाकरमान्यांना पडणार असून सध्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये परवडणारा नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून राज्यांतर्गत सवलतीच्या दरात बस सेवा उपलब्ध करावी लागणार आहे.

- Advertisement -

विशेष रेल्वे गाड्या सुरु करा

वास्तविक राज्यातील जनतेने लॉकडाऊन काळात गेले चार महिने संयम राखून कोरोनाच्या लढ्यात शासनाला सर्वोतोपरी सहकार्य केले आहे. आता किमान सवलतीच्या दरात गणेशोत्सवानिमित्त तरी  परिवहन सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच सर्व गोष्टींचा विचार करून कोकणासह राज्यात गणेशोत्सवानिमित्त जाणार्‍या चाकरमान्यांसाठी राज्य परिवहन मंडळाची बस सेवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावी, शक्य असल्यास केंद्राकडे कोकणासाठी खास रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी राजू पाटील यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

गणपतींसाठी कोकणात जाणार्‍या कोकणवासिंयाना खासगी बसेस मनमानी भाडे आकारत आहेत. कोकणवासियांसाठी सवलतीच्या दरात बसेस उपलब्ध करुन दिल्यास तसेच कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडल्यास या कठीण काळात त्यांना थोडा दिलासा मिळेल.
– राजू पाटील,आमदार,कल्याण ग्रामीण 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -