नाशिक : २०२४ च्या एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे. पुढील अवघ्या ४ ते ५ महिन्यात निवडणुकांची धामधूम सुरू होईल. त्याच अनुषंगाने या वेळी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयारीत आघाडी घेतल्याचे बघायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या आदेशाने सरचिटणीस अॅड. किशोर शिंदे याच्याकडे नाशिकच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गुरुवारी (दि. २४) शिंदे यांनी नाशिक लोकसभेतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आज विधानसभा निहाय आढावा घेतला जाणार आहे.
‘स्थानिक स्वराज्य निवडणुका आता होणार नाहीत, थेट लोकसभेच्या तयारीला लागा’ असे आदेश काही दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. तसेच, पक्षीय पातळीवरही ठाकरे यांनी तयारीला वेग दिल्याचे बघायला मिळत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात २००९ च्या निवडणुकीत दोन क्रमांकाची मते मनसेने घेतली होती. २०१४ साली मोदी लाटेचा फटका बसला असला तरी मतदारसंघात मनसेचा मतदार आहे. त्याच अनुषंगाने नाशिक लोकसभेकडे मनसेने लक्ष केंद्रित केल्याच बघायला मिळत आहे. नाशिक लोकसभेचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस अॅड. किशोर शिंदे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २३ आणि २४ ऑगस्ट असे दोन दिवस शिंदे नाशिक लोकसभेचा विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेणार आहेत. जमा केलेली सर्व माहिती राज ठाकरे यांना सादर केली जाणार असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज स्वतः नाशिकचा दौरा करून नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कानमंत्र देतील.
राज सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नाशकात
मागील आठवड्यात पुण्याच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे तिथून थेट नाशिकमध्ये दाखल होतील असे बोलले जात होते. मात्र, त्यांनी नाशिक दौरा पुढे ढकलला आहे. नाशिक लोकसभेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी आपले निरीक्षक पाठवले असून राज ठाकरे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २ ते ३ दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदार संघ मानसेसाठी पूरक आहे. त्या अनुषंगाने येथील स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देऊन तयारीला वेग दिला जाणार असल्याचे बोलले हाते.
मनसे राज्यात लढवणार २० ते २२ जागा
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार प्रचार केलेल्या राज ठाकरे यांनी यावेळी पूर्ण ताकदिने मैदान उतरण्याची तयारी सुरू केली आहे. आवाका लक्षात घेता मनसेचा प्रभाव असलेल्या २० ते २२ लोकसभा मतदार संघात पूर्ण ताकद लढण्याची तयारी मनसेच्या वतीने केली जात असल्याचे समजते.