मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. विधानसभेला राज ठाकरे यांनी ‘एकला चलोरे’ची भूमिका घेतली. मात्र, माहीमध्ये अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यायचा विषय आला, तेव्हा शिंदेंच्या शिवसेनेनं नकारघंटा कळवला. तसेच, राजू पाटील यांच्या रूपानं असलेल्या मनसेच्या एकमेव आमदाराचाही शिंदेंच्या शिवसेनेतील राजेश मोरे यांनी पराभव केला. यावरून मनसे नेते, अविनाश जाधव यांनी महायुतीवर सडकून टीका केली आहे.
महायुतीनं राज ठाकरे यांची फसवणूक केली आहे. महायुतीसाठी राज ठाकरेंनी प्रत्येक गोष्ट केली. मात्र, राज ठाकरेंना देण्याची वेळ येते, तेव्हा महायुतीचे हात आकडते येतात, असं म्हणत अविनाश जाधव यांनी फटकारलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
अविनाश जाधव म्हणाले, “महायुतीनं राज ठाकरे यांची जेवढी फसवणूक केली, तेवढी कुणीही केली नाही. राज ठाकरे हे मैत्रीच्या दुनियेतील राजामाणूस आहेत. महायुतीसाठी राज ठाकरे यांनी प्रत्येक गोष्ट केली आहे. मात्र, राज ठाकरे यांना देण्याची वेळ येते, तेव्हा यांचे हात आकडते येतात.”
हेही वाचा : ‘मविआ’तून बाहेर पडा, हिंदुत्त्वासाठी स्वतंत्र लढा; पराभूत उमेदवारांची ठाकरेंकडे मागणी, पण…
“लोकसभेला आम्ही महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे रत्नागिरीसह अनेक ठिकाणी फायदा झाला आहे. जोगेश्वरीची जागा मनसेमुळे आली आहे. जो माणूस तुम्हाला मैत्रीत सगळ्या गोष्टी सोडतो. तुम्ही त्याच्या पक्षाला पाण्यात पाहता? हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य नाही का?” असा सवाल अविनाश जाधव यांनी व्यक्त केला.
“आमच्याबाबत काहीतरी चांगला निर्णय होईल, हे अपेक्षित आहे. पण, तशा अपेक्षा फार कमी आहेत. कारण त्यांचा पूर्वइतिहास पाहता, मनसेबाबत ते असा कोणता निर्णय घेतील, वाटत नाही,” अशी खोचक टिप्पणी करत अविनाश जाधव यांनी महायुतीला टोला लगावला आहे.
हेही वाचा : भाजपच्या ‘त्या’ ऑफर्सवर शिंदेंनी टाकली गुगली, वरिष्ठ नेतृत्त्व पेचात; कसा मार्ग काढणार?