जनजागृती झाली आता तरी कोरोनाची कॉलरट्यून बंद करा; मनसेची मागणी

Bala Nandgaonkar MNS on Corona Caller Tune
बंद करा ती कॉलर ट्यून, मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मागणी

देशात २५ मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित झाला. तेव्हापासून कुणालाही फोन केल्यानंतर कोरोनाबाबत जनजागृती करणारी कॉलर ट्यून ऐकायला यायची. आता पाच महिने झाल्यानंतर लोकांमध्ये बऱ्यापैकी जागृती निर्माण झाली आहे. तसेच अनलॉकची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे, त्यामुळे गरज नसताना घराबाहेर पडू नये, सांगण्यात देखील अर्थ नाही. सर्वसामान्यांना पडणारे हे प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केले आहेत. नांदगावकर यांनी ट्विटरवर ट्विट करत आपली भूमिका मांडली तसेच ही कॉलर ट्यून बंद करा, अशी मागणी त्यांनी केली.

नांदगावकर म्हणाले की, “कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोना ची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो अथवा लागत नाही, त्यामुळे जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी.”

अगदी सुरुवातीला म्हणजे मार्च महिन्यात फोन लावल्यानंतर खोकल्याचा आवाज यायचा आणि त्यानंतर कॉलर ट्यून सुरु व्हायची. त्यामुळे अनेकांचा गैरसमज होत होता. यातून टीका झाल्यानंतर ती कॉलर ट्यून मागे घेण्यात आली होती. त्यानंतर “आपल्याला रोगाशी लढायचंय, रोग्याशी नाही”, ही कॉलर ट्यून ऐकायला मिळू लागली. तर अनलॉकची प्रक्रिया चालू झाल्यानंतरही कॉलर ट्यून सुरु आहे. याबाबत अनेकदा लोकांनी तक्रार केलेली आहे.

काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी सुद्धा या कॉलर ट्यूनवर टीका केली होती. तीन महिन्यांपासून फोनवर कॉलर ट्यून वाजवून लोकांच्या मनात भीती निर्माण केली जात आहे का? यामागे कोणते षडयंत्र आहे, असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला होता.