अरे नवाब सेनेबरोबर कोणी राहणार आहे की नाही?, गजानन काळेंची ठाकरेंवर टीका

gajanan kale

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली आहे. शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी एकनाथ शिंदे यांनी स्वत:च बरखास्त केली आहे. तसेच शिंदे गटातून शिवसेना मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाला अनेक आमदार, नगरसेवक आणि आता खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. दरम्यान, अरे नवाब सेनेबरोबर कोणी राहणार आहे की नाही ?,एकच पत्र काढून एकदाच काय ती हकालपट्टी का करत नाही? असा सवाल करत मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेसह ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले गजानन काळे?

आमदार गेले,नगरसेवक गेले आणि आज ऐकतोय तर काय खासदार ही गेले, १४ खासदार यांनी शिंदे गटाच्या बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली. अरे नवाब सेनेबरोबर कोणी राहणार आहे की नाही ? बहुतेक सय्यद बंडा आणि विश्व प्रवक्ते हे दोघेच मोठे नवाब, छोटे नवाब यांच्या बरोबर राहतील असं चित्र दिसतंय, असं ट्विट गजानन काळेंनी केलं आहे.

एकच पत्र काढून एकदाच काय ती हकालपट्टी का करत नाही?

बाप-लेक आणि विश्व प्रवक्ते यांनी फक्त पदावर राहून बाकी सगळ्यांची एकच पत्र काढून एकदाच काय ती हकालपट्टी का करत नाही? ते रोज रोज पत्र काढण्याचा त्रास तेवढा वाचेल. आणि रोज सकाळी उठल्यावर याची हकालपट्टी,त्याची हकालपट्टी यातून जनताही मोकळी होईल, असा निशाणा काळेंनी ठाकरेंवर साधला आहे.

एकनाथ शिंदेंनी नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्यामुळे ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या आमदारांची ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक सुरू होती. या बैठकीत शिवसेनेच्या १९ पैकी १४ खासदारांनी ऑनलाईनच्या माध्यमातून उपस्थितीत लावली होती. शिवसेनेचे खासदार शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, काल या चर्चेवर शिक्कामोर्तब झाला आहे.


हेही वाचा : 1 एप्रिल 2021 पासूनच्या टेंडर न काढलेल्या कामांना शिंदे सरकारची स्थगिती