मुंबई महापालिका निवडणुकीआधी ‘मसल मॅन’चा राज ठाकरेंना धक्का, मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा

संग्रहित छायाचित्र

मुंबई महापालिका निवडणुकीआधी मनसेला एक मोठा धक्का बसला आहे. मनसेचे मसल मॅन म्हणून ओळखले जाणारे मनीष धुरी यांनी पक्षातील सर्व पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचं धुरी यांनी म्हटलं आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचं दिसत आहे. परंतु मनसेच्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर धुरी यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे म्हटले आहे.

महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधीच मनीष धुरी यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दलही त्यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असलो तरी पक्षात यापुढे राज ठाकरे समर्थक म्हणून काम करणार आहे, असं धुरी यांनी पत्रात म्हटलं आहे.

मनीष धुरी हे मनसेचे अंधेरी विभागाचे अध्यक्ष आहेत. धुरी हे राज ठाकरेंचे भारतीय विद्यार्थी सेनेपासून कट्टर समर्थक आहेत. मनसेच्या अनेक आंदोलनात मनीष धुरी यांचा आक्रमक सहभाग असायचा. मात्र, त्यांनी राजीनामा दिल्यामुळे मनसेत खळबळ उडाली आहे. आता धुरी यांच्या जागी अंधेरी विभाग अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे जाणार? अशी चर्चा रंगली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी बांधणी सुरू केली आहे. मनसेने देखील मुंबईतील संघटना बांधणीवर प्रचंड भर दिला आहे. परंतु धुरी यांचा राजीनामा मनसेसाठी मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.


हेही वाचा : खुशखबर! मार्चमध्ये होणार कोस्टल रोडचे उद्घाटन