घरताज्या घडामोडीराज ठाकरे - देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; हाच का मनसेचा वेगळा...

राज ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; हाच का मनसेचा वेगळा पर्याय?

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रभादेवी येथील इंडियाबुल्स इमारतीत गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तब्बल १ तास बंद दाराआड चर्चा झाल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, ही बैठक कोणत्या मुद्द्यावर झाली हे अद्याप कळू शकलेले नाही. ही बैठक राजकारणाबाबत होती की ईडी प्रकरणी? हे अद्याप कळले नसले तरी देखील या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.

फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे इंडियाबुल्स इमारतीच्या मागच्या गेटने बाहेर पडले. ही भेट अत्यंत गोपनीय होती. जवळपास १ तास दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मित्र गुरुप्रसाद रेगे हे देवेंद्र फडणवीस यांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी खाली आले होते.

- Advertisement -

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून मनसे प्रमुख राज ठाकरे हे काहीतरी वेगळी राजकीय भूमिका करण्याच्या मनस्थितीत असल्याच्या बातम्या येत होत्या. तसेच मनसे आपला तीन रंगाचा झेंडा बदलून केवळ भगव्या रंगात आणणार असल्याची बातमी आपलं महानगरने सर्वात आधी दिली होती. शिवसेनेने धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी केल्यामुळे हिंदुत्वाची स्पेस भरून काढणाऱ्या मराठी माणसांच्या संघटनेची गरज होती. ही स्पेस भरून काढण्याची जबाबदारी मनसे घेणार आहे. त्यासोबतच भविष्यात आम्ही भाजपला समर्थन देऊ, असे सुतोवाच कालच मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे रहस्य वाढले आहे.

Raj Thackeray MNS Flag news
दि. ५ जानेवारी रोजी आपलं महानगरने दिलेली बातमी

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये राज ठाकरे यांनी मनसेचा एकही उमेदवार उभा न करता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी राज्यात दहा सभा घेतल्या होत्या. या सभांमध्ये त्यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत भाजपला धडकी भरवली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची इच्छा असूनही काँग्रेसच्या नकारामुळे मनसेला आघाडीसोबत घेता आले नाही. त्याचा परिणाम म्हणून राज ठाकरेंचा केवळ एकच आमदार विधानसभा निवडणुकीत निवडून आला. आम्ही आजवर आघाडी, युती मधील सर्वच पक्षांना मदत केलेली आहे. मात्र आम्हाला कुणीही मदत केली नाही, अशी खंत बाळा नांदगावकर यांनी बोलून दाखवली होती.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -