Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे 'महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गिरीश बापटांनी कसोशीने पाळली'; राज ठाकरेंनी व्यक्त केला शोक

‘महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गिरीश बापटांनी कसोशीने पाळली’; राज ठाकरेंनी व्यक्त केला शोक

Subscribe

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गिरीश बापट यांनी कसोशीने पाळली. त्यांच्या निधनाची बातमी अतिशय दु:खद आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असे राज ठाकरे म्हणाले.

पुण्यातील भाजप नेते खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या अनेक दिवसांपासून बापट आजारी होते. त्यांच्या निधनानंतर राज्यातील अनेक नेत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे या ठाकरे बंधूंनीदेखील ट्वीट करत बापट यांचं जाणं दु:खद असल्याचं म्हटलं आहे.

राजकीय मतभेद हे व्यक्तिगत मैत्रीच्या आड येऊ दिले नाहीत

पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, माजी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. राजकीय मतभेद हे व्यक्तिगत मैत्रीच्या आड येऊ द्यायचे नसतात. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गिरीश बापट यांनी कसोशीने पाळली. त्यांच्या निधनाची बातमी अतिशय दु:खद आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असे राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

 

राज्याने एक उत्कृष्ट संसदपटू गमावला

- Advertisement -

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक व्यापक जनसंपर्क असलेला नेता आणि उत्कृष्ट संसदपटू गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना, असे ट्वीट ठाकरे यांनी केले आहे.

शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने वृत्त अत्यंत दु:खद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला.

पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत शरद पवार यांनी व्यक्त केल्या.

( हेही वाचा: Girish Bapat passed away: संघ स्वयंसेवक, कामगार नेते ते खासदार ‘अशी’ राहिली गिरीश बापटांची चार दशकांची कारकिर्द )

- Advertisment -