मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींचा अटकपूर्व जामीन मंजूर

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं हा जामीन मंजूर केला आहे.

संदीप देशपांडे यांच्यावरती शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्या दिवशी हा गुन्हा दाखल झाला त्या दिवसापासून संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे नॉट रिचेबल आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यासंदर्भातील दोन्हीबाजूचे युक्तीवाद न्यायालयात काल पूर्ण झाले. अखेर आज संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अटकेची कारवाई आता टळली आहे.

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. दर महिन्याच्या १ आणि २३ तारखेला पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याची अट यामध्ये घालण्यात आली आहे. त्यांच्या चालकाला देखील जामिन देण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ४ मे पासून भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्याबाबत दिलेला अल्टीमेटम संपला होता. यामुळे पोलिसांनी मनसे नेत्यांची धरपकड सुरु केली होती. यात मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे ठाकरेंच्या बंगल्याबाहेर आले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतू त्यांनी पोलिसांना झटका देऊन कारमध्ये बसून पलायन केले होते. या साऱ्या गदारोळात महिला पोलीस अधिकारी रस्त्यावर आदळली होती. यामुळे पोलिसांनी या दोघांविरोधात ३५३ कलमाद्वारे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी देशपांडेच्या कारच्या चालकाला अटक करण्यात आली होती. संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजेच मागील 15 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेल्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा शिवाजी पार्क पोलीस व मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत होती. मुंबईसह आसपासच्या परिसरात पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. मात्र ते कुठेच सापडले नव्हते. मात्र आता मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांना दिलासा मिळाले आहे.