‘लाथो के भूत बातों से नही मानते’; वाढीव वीज बिलावरुन मनसेचा सरकारला इशारा

mns leader sandeep deshpande wars thackeray govt over huge electricity bills

लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव वीजबिलातून नागरिकांना दिलासा देण्याच्या मुद्यावरुन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी यूटर्न घेतल्यानंतर आता मनसे आक्रमक झाली आहे. दरम्यान, वीज कंपन्या चुकीचे देयक देणार आणि सरकार त्याचे पैसे भरणार, हे कसे चालेल, असा सवाल करत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीतील अर्थ विभागाने नितीन राऊत यांची सवलतीची मागणी फेटाळली. त्यामुळे वीजबिलात सवलत मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे आता लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वीज बिलावरुन आता उर्जामंत्र्यांवर टीका करताना मनसेने ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. “वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळे झाले. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल. कारण लाथो के भूत बातों से नही मानते,” असे ट्विट देशपांडे यांनी केले आहे.

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिवाळीपर्यंत वाढीव वीज बिलातून सवलत मिळेल असे ऑक्टोबरमध्ये जाहीर केले होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राऊत यांनी सवलत देण्याचा विषय चर्चेत आणला. प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तपशीलवार माहिती दिली. मात्र, अर्थ विभागाने सवलत देण्यास हरकत घेतली. अर्थखात्याकने मागणी फेटाळल्यानंतर अखेर नितीन राऊत यांनी वीज देयकात सवलत शक्य नाही, असे स्पष्ट केले. वीजवापराप्रमाणे आलेली देयके ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असे नितीन राऊत म्हणाले. त्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे.