अजित पवारांच्या पक्षप्रवेशाच्या ऑफरवर वसंत मोरेंचे स्पष्टीकरण, म्हणाले ‘ते वेळच ठरवेल’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यातील आक्रमक आणि धडाकेबाज चेहरा म्हणून वसंत मोरे यांच्याकडे पाहिले जाते. मात्र ते गेल्या काही महिन्यांपासून पक्षाच्या काही भूमिकांवर नाराज असल्याची चर्चा रंगतेय. त्यामुळे वसंत मोरे आता मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. अशात विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी वसंत मोरे यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ज्यावर खुद्द वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

वसंत मोरे म्हणाले की, पुणे शहराचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या भावाच्या मुलाच्या लग्नासाठी मी बावदाण या ठिकाणी गेलो होतो. यावेळी तिथे बंटी पाटील, अरविंद शिंदे आणि रुपालीताई चाकणकर सुद्धा उपस्थित होत्या. यावेळी अचानक अजित पवार यांची एन्ट्री झाली, यावेळी अजित दादा स्वत:हून माझ्याकडे आले आणि म्हणाले अरे किती नाराज तात्या या आम्ही वाट बघतोय तुमची. यानंतर पुन्हा आम्हा दोघांची भेट झाली, त्यावेळीही अजित पवार म्हणाले की, वसंतराव या बरं का वाट बघतोय, अशी माहिती वसंत मोठे यांनी दिली.

पक्ष वाढीची कोणताही भूमिका नाही, पक्षातील लोक कमी कसे होती याकडे लक्ष अधिक. मला या लोकांची लाज वाटते. कारण माझ्या वाढदिवसाला कमीतकमी लोक कसे येतील याची जर ही लोक वाट पाहत असतील तर ह्यांना पद कशासाठी दिलीत असा प्रश्न पडतो.

येरोडोच्या एका कार्यक्रमात मी स्टेजवर येण्याआधीच दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला. पण वसंत मोरेंना कधीच अस्तित्वाची भीती वाटली नाही. ज्यांना भीती वाटते तोच छुप्याने असाप्रकारे वागतो. मी माझी नाराजी थेट राज ठाकरेंकडे पोहचवली आहे. माझ्या उपक्रमांवेळी अनेक बैठका घेतल्या जातात. त्यावेळी स्वत: राज ठाकरेंनी याची दखल घेतली होती. पण न्याय मिळाला नाही. चिंतन शिबिराला निमंत्रण मिळालं नाही, अशी भूमिकाही वसंत मोरेंनी मांडली आहे.

आगामी निवडणुकीत वसंत मोरे यांच्या शर्टावर मनसेचा लोगो राहिला की दुसऱ्या पक्षाचा या प्रश्नावर वसंत मोरे म्हणाले की, ते वेळ ठरवेल. या उत्तरावरून तरी मोरेंची नाराजी अप्रत्यक्षरित्या जाहीर होत आहे. कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. अतिशय घाणेरडे राजकारण आहे. मी काही शोपिस नाही, मी कुठल्याही कळपातला नाही, कळपात शेळ्या मेंढ्या चालतात. वाघ हा एकटा असतो अशा इशाराही वसंत मोरे यांनी दिला आहे.

दरम्यान अजित पवारांच्या भूमिकेवर वसंत मोरे म्हणाले की, कदाचित हा माझ्या कामाचा सन्मान आहे. अजित पवार स्वत:हून मला बोलवत आहेत. मी ज्या मार्गावर आहे तो मार्ग अतिशय योग्य असल्याचे मला वाटते अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.


श्रद्धा वालकर हत्याकांड: लव्ह जिहाद विरोधात हिंदू संघटनांचा साताऱ्यात विराट मोर्चा