राज ठाकरे रस्त्यावर उतरणार, पुण्यात तळजाई टेकडीवरील प्रकल्पाच्या विरोधासाठी २४ ऑक्टोबरला आंदोलन

Raj Thackeray

आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता पुण्यात रस्त्यावर उतरणार आहेत. तळजाई टेकडीवरील प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पुण्यात मनसेचं २४ ऑक्टोबरला आंदोलन आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन असणार आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे लक्ष असणार आहे.

मनसेच्या या आंदोलनाची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली. पुण्यातील तळजाई टेकडीवर जैवविविधता वसुंधरा प्रकल्प होणार आहे. मात्र हे एकप्रकारचं अतिक्रमण केलं जाणार आहे आणि त्याला आमचा विरोध आहे, असं म्हणत आम्ही याविरोधात आंदोलन करणार आहोत, असं वसंत मोरे यांनी सांगितलं. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात येत्या २४ तारखेला हे आंदोलन होणार आहे. सकाळी ७ वाजताच या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं.

भाजपसोबत युतीची चर्चा नाही

शनिवारी राज ठाकरे पुण्यात होते. त्यांनी तिथल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध मतदारसंघांचा आढावा घेतला. तसंच, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सूचना देखील दिल्या. यावेळी या बैठकीत भाजपसोबतच्या युतीची चर्चा झाली नाही. मात्र, आम्ही निवडणुकीसाठीची तयारी सुरु केली असून यावेळी पुण्याचा महापौर मनसे ठरवणार, असं वसंत मोरे म्हणाले.

तळजाई बचाव अभियान

पुण्यातील सहकारनगर भागातील तळजाई टेकडीवरील सुमारे १०७ एकर जागेवर नियोजित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा पुणे महापालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. तळजाई जैवविविधता वसुंधरा प्रकल्पास नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शवला असून या प्रकल्पामुळे परिसरातील मूळ जैवविविधता नष्ट होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा प्रकल्पच रद्द करण्यासाठी नागरिकांनी ‘तळजाई बचाव अभियान’ सुरू केलं आहे. या अभियानाची दखल मनसेनेही घेतली असून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.