भाजप, व्यापारी संघटनांनंतर मनसेचाही महाराष्ट्र बंदला विरोध

MNS President Raj thackeray

महाविकास आघाडीने त्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये आंदोलक शेतकर्‍यांवरील अत्याचाराचा निषेध म्हणून सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला काही संघटनांनी पाठिंबा दिला असला तरी भाजप आणि व्यापारी संघटनांनी मात्र याला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, आता मनसेने देखील भाजप, व्यापारी संघटनांपाठोपाठ महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे उद्या सोमवारी बंद किती प्रमाणात होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

लखिमपूर खेरी येथे घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आम्ही देखील त्याचा निषेध करतो. परंतु महाराष्ट्रात सरकार मधीलच पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामागे नेमकं कोणते लॉजिक आहे कळत नाही. आधीच कोरोनामुळे गेले दीड दोन वर्ष व्यापारी आर्थिक संकटात आहे. आता कुठे काही प्रमाणात सर्व सुरळीत होतंय त्यात असे बंद व्यापाऱ्यांना परवडणारे नाहीत आणि निषेध करायचा तर अन्य मार्ग आहेत त्याचा अवलंब करावा बंदच का? सरकारच बंद करणार असेल तर गाऱ्हाणं मांडायच तरी कोणाकडे? या बंदमध्ये सामिल न होता व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपली दुकाने चालु ठेवावीत, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी जाहीर केली आहे.

महाराष्ट्र बंदला व्यापारी संघटनांचा विरोध

महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यापाठोपाठ मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. उद्या दुकाने सुरुच राहतील. मात्र, आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका, असं आवाहन विरेन शहा यांनी मुंबई व्यापारी संघामार्फत केलं आहे. कोरोनानंतर बऱ्याच वेळाने दुकाने सुरु झाली आहेत. सध्या नोकरांचा पगार देणंसुद्धा जिकरीचं झालं आहे. आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे, असं सांगत विरेन शहा यांनी मुंबई व्यापार संघाची भूमिका मांडली.

भाजप रस्त्यावर उतरून महाराष्ट्र बंदला विरोध करेल

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीने घोषणा केलेल्या ११ ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदला जाहीर विरोध केला आहे. लखीमपूरमधील एका घटनेचं राजकीय भांडवल करण्याचा ढोंगीपणा हे लोक करत आहेत. आधीच टाळेबंदी करुन यांनी मुंबईकरांची रोजीरोटी संपवली होती. त्यातलाच हा आणखी एक प्रकार आहे. मात्र, मुंबईत भाजप प्राणपणाने या बंदला विरोध करेल. जर कुणी सरकारी दडपशाही करून किंवा पक्षीय दडपशाही करून मुंबईकरांना त्यांचे व्यवहार बंद करण्याचा प्रयत्न केला, तर भाजपा रस्त्यावर उतरून याला विरोध करेल, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्याचा महाविकास आघाडीने पुकारलेला बंद किती यशस्वी होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.