‘चित्रपट उद्योग हलवा नाही की, डब्यात घालून…’; चित्रनगरीच्या राजकारणाला मनसेचा विरोध

मुंबईची ओळख असलेली दादासाहेब फाळके चित्रनगरी उत्तरप्रदेशात नेण्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई दौऱ्यावर असताना योगींनी बॉलिवूडचे अभिनेते आणि निर्माते यांच्यासोबत संवाद साधला. त्यावरून राज्यात राजकारण सुरू झाले असून, याच राजकारणाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे.

sandeep deshpande

मुंबईची ओळख असलेली दादासाहेब फाळके चित्रनगरी उत्तरप्रदेशात नेण्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई दौऱ्यावर असताना योगींनी बॉलिवूडचे अभिनेते आणि निर्माते यांच्यासोबत संवाद साधला. त्यावरून राज्यात राजकारण सुरू झाले असून, याच राजकारणाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. ‘चित्रपट उद्योग हा काही हलवा नाही कि डब्यात घालून नेता येईल त्यामुळे चिंता नसावी’, अशा शब्दांत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली. (MNS opposition to Dadasaheb Phalke Chitranagari politics in Mumbai)

मुंबईची ओळख असलेली दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबईबाहेर नेण्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट केले आहे. “बॉलीवूड आणि मुंबई हे अतूट नातं आहे. चित्रपटसृष्टींची सुरवात ही स्वर्गीय दादासाहेब फाळकेंनी केली होती. चित्रपट उद्योग हा काही हलवा नाही कि डब्यात घालून नेता येईल त्यामुळे चिंता नसावी”, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी ट्विट करत दादासाहेब फाळके चित्रनगरीवरून सुरू असलेल्या राजकारणाला विरोध केला आहे.

नुकताच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही राष्ट्रवादीचे आमदार अभिजीत वंजारी यांनी मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरी गुजरातला नेणार का, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावेळीही विधान परिषदेत सत्ताधारी आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार अभिजीत वंजारी यांच्यात वाद झाला होता.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील नोएडा येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फिल्मसिटीचा ड्रीम प्रोजेक्ट उभा राहत आहे. या प्रोजेक्टला चालना देण्यासाठी योगी मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशात पळवू पाहत आहेत, असा आरोप त्यांच्यावर मविआतील नेत्यांकडून होत आहे. त्याला उत्तर देताना मुंबई ही मुंबईच आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, तर उत्तर प्रदेश ही भारताची धार्मिक राजधानी आहे. आम्ही उत्तर प्रदेशात स्वत:ची फिल्मसिटी उभारत आहोत. मुंबईमधून फिल्मसिटी नेण्याचा आमचा कोणताही डाव किंवा विचार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – मुंबईतून फिल्मसिटी नेण्याचा डाव नाही योगी आदित्यनाथ यांचे स्पष्टीकरण