मनसेने उचलला बालमजुरीचा मुद्दा, आपल्या पद्धतीने धडा शिकवण्याचा मनसैनिकांना आदेश

Raj Thakrey

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यातील लहान मुलांच्या वेठबिगारीच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. राज ठाकरेंनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये राज्यात नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर आशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार वाढत असल्याचे म्हटले आहे. यावर कारवाईची मागणी राज ठाकरेंनी शिंदे फरणवीस सरकारकडे केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विविध वर्तमान पत्रामध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडले जात आहे, अशा बातम्या वाचल्या. या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत, असे राज ठकरेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी पुढे महाराष्ट्र सैनिकांनाही वेळ पडली तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना आपल्या पद्धतीने धडा शिकवण्याचे रोखठोक आदेश दिल्याचे  पोष्टमध्ये म्हटले आहे.

पोस्टमध्ये नेमके काय –

पोस्टमध्ये गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत.

नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही.

राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं.

पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांत तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील. ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.