मनसेचे हिंदुत्व रिझल्ट देणारे

राज ठाकरेंचे शिवसेनेला सडेतोड प्रत्युत्तर, अयोध्या दौर्‍याला विरोधाचा सापळा, महाराष्ट्रातूनच रसद पुरवली,

राज ठाकरे यांचा आरोप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येचा पूर्वनियोजित दौरा स्थगित करताच शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसने या दौरा स्थगितीच्या निर्णयावर चांगलेच तोंडसुख घेतले. उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी परप्रांतीयांना झालेल्या मारहाणीवरून राज यांच्या दौर्‍याला कडाडून विरोध केला होता. रविवारी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात बोलताना राज ठाकरे यांनी हा दौरा स्थगित का केला यावर अखेर स्वत:च खुलासा केला. सोबतच अयोध्या दौर्‍याच्या निमित्ताने एक सापळा रचण्यात आला. या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. या सभेत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राणा दाम्पत्य, संजय राऊत आणि ओवेसींवरदेखील निशाणा साधला. हिंदुत्वाच्या मुद्यावरून सुरू असलेले राजकारण, टोलनाका, रेल्वे परीक्षा आंदोलनाचे दाखले देताना खरे हिंदुत्व म्हणजे काय? लोकांना त्याचे रिझल्ट हवे आहेत, जे आम्ही देत आहोत. महाराष्ट्रातील मराठी माणसाला आम्ही रिझल्ट देत आहोत, असा दावादेखील राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच अयोध्या दौरा स्थगितीच्या मुद्यावरून केली. पायांना त्रास होत असल्यामुळेच मला पुणे दौरा अर्धवट सोडावा लागला. माझ्या हीपबोनवर 1 तारखेला शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, मी अयोध्या दौरा स्थगित करताच काहींना वाईट वाटले, काहींना आनंद झाला, तर काही जण कुत्सितपणे बोलू लागले. त्यांना बोलण्यासाठी मी दोन दिवसांचा वेळ दिला. त्यानंतर मी माझी भूमिका महाराष्ट्राला आणि देशाला सांगण्यासाठी ही सभा घेतली. मशिदींविरोधातील भोंग्यांच्या आंदोलनानंतर जेव्हा मी अयोध्या दौर्‍याची घोषणा केली, तेव्हा ती अनेकांच्या डोळ्यांत खुपली. त्यात अनेक जण होते. त्यानंतर पद्धतशीरपणे आराखडा तयार करून माझ्या अयोध्या दौर्‍याला विरोध सुरू झाला.

कुठला तरी खासदार उठतो आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. हे शक्य तरी आहे का? माझ्या दौर्‍याला विरोध नेमका का होतोय याबाबत मुंबईसह यूपीतूनही माहिती मिळवली. तेव्हा मला समजले की हा एक सापळा आहे. या विरोधाला महाराष्ट्रातूनच रसद पुरवण्यात आली. समजा मी अयोध्या दौर्‍यावर गेलो असतो आणि जर का तिथे आपल्याला कुणी डिवचले असते, तर मनसैनिकही अंगावर धावले असते. आपल्या पोरांच्या अंगावर केसेस टाकल्या असत्या. त्यांना तिथल्या तुरुंगात सडवले असते आणि निवडणुकांच्या वेळी मात्र इथे कुणीही नसते. हा एक सापळा होता. एकवेळ मी टीका सहन करायला, चार शिव्या खायला तयार आहे, परंतु आपली पोरं हकनाक अडकू देणार नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

उत्तर भारतीयांना मारहाणीच्या घटनेवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी बृजभूषण सिंह यांना सवाल केला की, तुम्हाला 12 ते 14 वर्षांनंतर अचानक कशी आठवण झाली? राज ठाकरे यांनी माफी मागितली तरच त्यांना अयोध्येत पाय ठेवू देऊ, असे ते म्हणाले. विषय माफी मागण्याचाच असेल तर गुजरातमध्ये एका मुलीवर बलात्कार झाल्यानंतर शेकडो यूपी, बिहारच्या कामगारांना ठार मारण्यात आले. अल्पेश ठाकूर याच्या आंदोलनानंतर गुजरातमधून परप्रांतीयांना हाकलून देण्यात आले. या घटनेसाठी कुणाकडून माफी मागाल, असा प्रश्न राज यांनी बृजभूषण सिंह यांना उद्देशून केला. हे राजकारण समजून घेणे गरजेचे आहे. यांना आपले हिंदुत्व झोंबले, लाऊडस्पीकर झोंबले, असे राज ठाकरे म्हणाले.

शिवसेनेमुळेच एमआयएम वाढतेय
मुख्यमंत्र्यांच्या राजकारणामुळेच औरंगाबादेत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करून एमआयएमचा खासदार निवडून आला. हेच एमआयएमचे नेते औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होतात आणि आपल्या राज्यकर्त्यांना याची लाजही वाटत नाही. शिवसेनेमुळेच एमआयएम वाढत आहे. एमआयएमचा माणूस औरंगजेबाच्या कबरीवर गेल्यानंतर महाराष्ट्र खवळेल, अशी मला आशा होती, मात्र महाराष्ट्र थंड होता. या कबरीचा विस्तार 10 ते 15 हजार फुटांपर्यंत झाला आहे. तेथे अफजल खानाच्या नावाने मशीदही बांधली जात आहे. त्यासाठी पैसेही येत आहेत. या औलादी महाराष्ट्रात असूनही आपण थंड कसे, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

पंतप्रधान मोदींकडे 3 मागण्या
देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणावा, समान नागरी कायदा लागू करावा आणि औरंगाबादचे संभाजीनगर करा, या माझ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 3 मागण्या असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचा ढोंगीपणा
राणा दाम्पत्याविषयी बोलताना त्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा हट्ट धरला. मातोश्री म्हणजे काय मशीद आहे का? एकमेकांवर एवढे आरोप-प्रत्यारोप केले. एवढा गोंधळ होऊनही संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लडाखमध्ये एकत्र जेवताना दिसले. एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढताना दिसले. हे दोघांच्याही कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. हे सगळे ढोंगी आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी केस आहे का?
मनसेचे प्रत्येक आंदोलन फसल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना मनसेचे हिंदुत्व हे केवळ आंदोलनासाठी नव्हे, तर रिझल्ट देणारे आहे. मनसेच्या आंदोलनानंतर राज्यातील 60 ते 70 टोलनाके बंद झाले. बॉलीवूडमधील पाकिस्तानी कलाकारांना देशातून हाकलून लावले आणि रेल्वे भरतीच्या परीक्षा स्थानिक भाषांतून व्हायला लागल्या, असे दाखले राज यांनी दिले, परंतु मुख्यमंत्री कोणाचे हिंदुत्व खरे आणि कोणाचे खोटे अशी पोरकट भाषा करीत आहेत. त्यांनी रिझल्ट दाखवावा. उद्धव ठाकरेंच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का? ते कोणती भूमिकाच घेत नाहीत, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.

मुख्यमंत्री म्हणतात, मी औरंगाबादला संभाजीनगर बोलत असल्याने नामांतर करण्याची गरजच काय? पण मुख्यमंत्री कोण आहेत? ते वल्लभभाई पटेल आहेत की महात्मा गांधी, असा सवाल राज ठाकरेंनी केला. औरंगाबादचे नामांतर करायचे असते तर आतापर्यंत झाले असते, पण शिवसेनेला केवळ राजकारणासाठी या मुद्याचा वापर करायचा आहे, असा आरोपही राज ठाकरेंनी केला.