Homeमहाराष्ट्रMNS Raju Patil : खरंच राजू पाटलांना त्यांच्याच गावातून एकही मतं मिळाले...

MNS Raju Patil : खरंच राजू पाटलांना त्यांच्याच गावातून एकही मतं मिळाले नाही का? आकडेवारी काय सांगते

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी आमदार राजू पाटील यांना झालेल्या मतदानाबाबत दावा केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण या मतदानाबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 30 जानेवारी) पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. वरळी येथील एनएससीआय डोममध्ये हा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले. आपल्याला विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मते दिली, पण ती आपल्यापर्यंत आली नाहीत, असे म्हणत ठाकरेंनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली. याचे उदाहरण देताना त्यांनी पक्षाचे नेते, कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांना त्यांच्याच गावात एकही मत मिळाले नसल्याचा दावा केला. ज्यानंतर याबाबत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर राज ठाकरेंच्या या दाव्यात किती सत्यता आहे, हे जाणून घेण्यासाठी एका मराठी वृत्तवाहिनीने राजू पाटलांच्या गावातील मतदानाची आकडेवारी जाहीर केली आहे. (MNS Raju Patil did not get single vote in his village as Raj Thackeray said)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी आमदार राजू पाटील यांना झालेल्या मतदानाबाबत दावा केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर एक मराठी वृत्तवाहिनी थेट राजू पाटील यांच्या काटई गावात पोहोचली. यावेळी समोर आलेल्या माहितीनुसार, राजू पाटलांच्या काटई गावात एकूण 1470 मतदार आहेत. तीन मतदान केंद्रावर राजू पाटील यांना गावातून 683 मते मिळाली. यामुळे आता या गावातील मतदान यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांच्या गावच उदहारण दिले होते. त्यामुळे राज ठाकरे यांना चुकीची माहिती कोणी दिली? असा प्रश्न गावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा… Raj Thackeray : लोकांनी मते दिली पण आपल्यापर्यंत आली नाही, विधानसभा निकालाबाबत राज ठाकरेंचा संशय

काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज ठाकरेंनी वरळीतील मेळाव्यात कल्याण ग्रामीण माजी आमदार, मनसे नेते राजू पाटील यांचे उदाहरण देत म्हटले की, राजू पाटलांचे एक गाव आहे तिथे फक्त पाटलांनाच मतदान होते. साधारणतः 1400 मतदारांचे गाव आहे. तिथे फक्त यांनाच मतदान केले जाते. याआधी राजू पाटील यांचे भाऊ निवडणुकीला उभे होते, तेव्हा त्यांना मतदान झाले, त्यानंतर राजू पाटील उभे होते तेव्हा त्यांना मतदान झाले होते, जेव्हा ते खासदारकीला उभे होते तेव्हा देखील तिथे मतदान झाले. मात्र यावेळी त्या गावातून राजू पाटलांना एक पण मत पडले नाही. अख्ख्या गावातून एकही मतदान पडत नाही, जी 1400 मते आहेत, ती दरवेळी राजू पाटलांना मिळायची, त्या गावात एक मत नाही पडत, असे सांगत राज ठाकरेंनी या संपूर्ण निकालावर प्रश्न उपस्थित केला.