घरमहाराष्ट्रमनसेला शिंदे सरकारमध्‍ये मिळणार स्थान

मनसेला शिंदे सरकारमध्‍ये मिळणार स्थान

Subscribe

सत्तांतरात साथ दिल्‍याने एक आमदार असूनही फडणवीस देणार मंत्रीपद

महाविकास आघाडी सरकारला धक्का देऊन शिंदे सरकार सत्तेवर आले, पण आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते मंत्रीपदाची माळ कोणाकोणाच्या गळ्यात पडणार याकडे. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांपेक्षाही छोटे पक्ष, अपक्षांपैकी कोणाला मंत्रीमंडळात स्थान मिळते याची चर्चा सुरू आहे. अलीकडेच हिंदुत्वाची कास धरलेल्या मनसेला मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता असून कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांना मंत्रीपदाची लॉटरी लागेल असे दिसत आहे.

आगामी महापालिका डोळ्यासमोर ठेऊन मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतून शिवसेनेला धक्का द्यायचा असेल तर शिंदे गटासोबत मनसेही सोबत हवी या रणनीतीचा भाग म्हणून १६ वर्षांनंतर मनसेला पहिल्यांदाच मंत्रिमंडळात घ्यावे यावर भाजपमध्ये चर्चा झाल्याचे खात्रीलायकरित्या समजते. हिंदुत्वाची कास सोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर घरोबा केल्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी उठाव केला. त्यांना छोटे पक्ष व अपक्ष अशा 10 आमदारांनी साथ दिली. मनसे, बहुजन विकास आघाडी, प्रहार या पक्षांनीही शिंदे सरकारच्या पारड्यात विश्वासदर्शक ठरावावेळी आपले मत टाकले होते.

- Advertisement -

याची पोचपावती म्हणून मनसेच्या एकमेव आमदाराला शिंदे यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, असे समजते. तसे झाल्यास मनसे आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही पक्षांना पहिल्यांदाच मंत्रीमंडळात स्थान मिळणार आहे. सन 2006मध्ये मनसेची स्थापना राज ठाकरे यांनी केल्यानंतर 2009मध्ये मनसेचे 13 उमेदवार विधानसभेवर निवडून आले. मात्र त्यानंतर 2014 साली शरद सोनावणे आणि 2019मध्ये राजू पाटील हे एकमेव आमदार विजयी झाले. त्यापैकी माजी आमदार सोनावणे हे सध्या शिवसेनेत आहेत. तर राजू पाटील एकमेव आमदार कल्याण-डोंबिवलीपासून विधीमंडळापर्यंत एकमेव किल्ला लढवत आहेत.

2019च्या निवडणुकांमध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला करणार्‍या राज ठाकरे यांनी एप्रिल-मेमध्ये पवित्रा बदलत थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर दिला. हा मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर आधीपासून होता, मात्र अलीकडच्या काळात तो केंद्रस्थानी आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री अ‍ॅड. आशिष शेलारसह विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांच्या राज ठाकरेंच्या नव्या शिवतीर्थ बंगल्यावर गाठीभेठीही वाढल्याने मनसे हिंदुत्वामुळे भाजपच्या अधिक जवळ जात आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

डोंबिवली- कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्यात फारसे सख्य नव्हते, मात्र सोमवारच्या बहुमत चाचणीच्या वेळी राजू पाटील यांनी शिंदे सरकारच्या पारड्यात मत टाकले. त्याआधी राज्यसभा, विधान परिषद, विधानसभा अध्यक्षपद या निवडणुकांमध्येही मनसेने भाजपला मदत केली होती. त्यामुळेच मनसेचा एकच आमदार असला तरी त्याला किमान राज्य मंत्रीपद मिळेल अशी चिन्हे आहेत.

बाळा नांदगावकर विधान परिषदेवर?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर हे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या पाठबळावर विधान परिषदेवर पाठवले जातील अशी शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महाविकास आघाडी सरकारने नावांची यादी पाठविली होती, परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यावर दीड वर्षे निर्णय घेतला नाही. आता शिंदे सरकार राज्यपालांकडे नव्याने यादी पाठवेल त्यात बाळा नांदगावकर यांचे नाव असण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -