हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवा, दसरा मेळाव्यासाठी मनसैनिकांची राज ठाकरेंना साद

हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठीजनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे आपण - हिंदूजननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे! महाराष्ट्र सेवकांची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की, दसऱ्याला आपण वंदनीय हिंदुहृदसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी माणसाला मार्गदर्शन करावे," अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

मुंबई – सत्तांतरानंतर दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने ठाकले आहेत. वारसदार असल्याचा दावा करत शिंदे आणि ठाकरे यांच्यात पुन्हा घमासान सुरू झाले आहे. त्यातच, आता या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली असून राज ठाकरेंनी दसरा मेळावा घ्यावा, अशी मागणी मनसैनिकांनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणी संदीप देशपांडे यांनी ट्वीटरद्वारे पत्र लिहिले आहे. “हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठीजनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे आपण – हिंदूजननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे! महाराष्ट्र सेवकांची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की, दसऱ्याला आपण वंदनीय हिंदुहृदसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी माणसाला मार्गदर्शन करावे,” अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

हेही वाचा – शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार

नेमकं काय लिहिलंय पत्रात?

वंदनीय हिंदुहृदसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे आणि शिवतीर्थावरील दसरा मेळावा हे आपल्या महाराष्ट्रातील केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक समीकरणही होते. सलग चार दशकांहून अधिक काळ ‘एक वक्ता, एक मैदान आणि लक्ष लक्ष श्रोते’ हा चमत्कार अवघ्या जगात कुठे पहायला मिळाला असेल तर तो इथेच, आपल्या शिवतीर्थावर! दसऱ्याच्या दिवशी मराठीजनांच्या रांगाच्या रांगा ढोल-ताशे वाजवत, गुलाल उधळत शिवतीर्थावर येत आणि हिंदुहृदसम्राटांकडून मिळालेलं राष्ट्रभक्ती आणि महाराष्ट्र धर्माचं ‘बाळकडू’- विचारांचं सोनं घेऊन घरी परतत.

दुर्दैवाने, वडिलोपार्जित वास्तूत राहतो इतक्याच पुण्याईवर स्वतःला हिंदुहृदसम्राटांचे राजकीय वारसदार म्हणवणाऱ्यांनी कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या आणि आक्रमक मराठी अस्मितेच्या धगधगत्या विचारकुंडालाच तिलांजली दिली. ज्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांवर प्रबोधनकार आणि हिंदुहृदयसम्राटांनी संपूर्ण हयातभर लेखणी, कुंचला आणि वाणीने आसूड ओढले, त्याच राष्ट्रद्रोही- धर्मद्रोही पक्षांशी आघाडी करून हिंदुत्वाच्या विचारांवर मतदान करणाऱ्या लक्षावधी शिवसैनिकांचा आणि मतदारांचा विश्वासघात केला, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला! बरं, इतकं सगळं करूनही स्वत:चा राजकीय पक्ष आणि सरकार या वारसदारांना सांभाळता आलं नाहीच.

हेही वाचा दसरा मेळावा शिवसेनेचा आहे शिवसेनेचाच राहणार : आदित्य ठाकरे

एरवी या सर्व गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं असतं. पण आता “कै. बाळासाहेब ठाकरे यांचे आम्हीच खरे वारसदार” असं म्हणत ‘यू टर्न’ आणि ‘बंडखोर’ असे दोन्ही गट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची भाषा करत आहेत. लक्ष लक्ष मराठीजनांसमोर हिंदुत्वाचं अग्निकुंड धगधगतं ठेवण्यासाठी ज्वलंत भाषण करण्याची क्षमता मात्र त्यांपैकी कुणातच नाही! ज्या दसरा मेळाव्यामुळे राज्यातील मराठी भूमिपुत्रविरोधी आणि देशभरातील हिंदूविरोधी राजकीय पक्षांना धडकी भरायची, तोच दसरा मेळावा आज राजकीय चेष्टा-मस्करीचा विषय ठरत आहे, याहून मोठी शोकांतिका ती कोणती?

वंदनीय कै. बाळासाहेब ठाकरे आणि शि व से ना या चार अक्षरांवर प्रेम करणारा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणारा प्रत्येक मराठी आणि हिंदू व्यथित झाला आहे, गोंधळला आहे. त्याच्या मनातला हा गोंधळ दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठीजनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे आपण – हिंदूजननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे! म्हणूनच कोट्यवधी हिंदू तसंच मराठीजनांच्या वतीने आमच्यासारख्या लक्षावधी हिंदवी रक्षकांची, महाराष्ट्र सेवकांची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की, दसऱ्याला आपण वंदनीय हिंदुहृदसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी माणसाला मार्गदर्शन करावे.

दसऱ्यानिमित्त शिवतीर्थावर आपल्या परखड, रोखठोक ‘ठाकरी’ शैलीतील वक्तृत्वाच्या तेज:पुंज आविष्काराची – “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…” या हाकेची महाराष्ट्र आणि अवघा हिंदुस्थान आतुरतेने वाट पहात आहेत. धन्यवाद!

दरम्यान, मनसैनिकांनी केलेली ही मागणी राज ठाकरे ऐकतात हे पाहावं लागेल. राज ठाकरे यांनी खरंच दसरा मेळावा घेतला तर तो नेहमीप्रमाणे नक्कीच आक्रमक ठरेल.