घरताज्या घडामोडीपालिकेच्या आगामी निवडणुकीत मनसेचा ‘राज’ चालणार

पालिकेच्या आगामी निवडणुकीत मनसेचा ‘राज’ चालणार

Subscribe

बालेकिल्ल्याची पून्हा जोरदार बांधणी; जुन्या-नव्या पदाधिकार्‍यांमधील एकजुटने कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढला

नाशिक एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला मानला जात. गेल्या महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत मात्र मनसेला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे काही काळ मनसेचे पदाधिकारी खचलेे खरे; पण आता पुन्हा नव्याने संघटन वाढीसाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. पक्षात नवे-जुने आता एकदिलाने काम करीत असल्यामुळे कार्यकर्त्यांचा ओढाही पक्षाकडे कमालीचा वाढला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मनसेचा पुन्हा बोलबाला असेल असे मानले जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नाशिककरांचे एक अतूट नाते आहे. शिवसेनेत असताना राज ठाकरे यांचा नाशिकशी घनिष्ट संबंध होता. त्यामुळे मनसेची स्थापना झाल्यानंतर राज यांना नाशिककरांनी सर्वप्रथम साथ देत, एकाच वेळी तीन आमदार आणि महापालिकेची सत्ता त्यांच्या हाती सोपवली. विकासाच्या ‘ब्लू प्रिंट’वर खुष होत राज यांच्या पारड्यात मते टाकण्यात आली. परंतु, आखलेल्या योजना कधी पक्षातील अंतर्गत वादामुळे तर कधी नैसर्गिक आपत्तींमुळे प्रत्यक्षात पूर्णत: उतरु शकल्या नाहीत. ठाकरे यांनी उभारलेल्या गोदाघाट प्रकल्पाचीही गोदावरीच्या पुराने पुरती वाट लागली.गेल्या महापालिकेच्या व त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेला जोरदार फटका बसला. त्यामुळे मनसेच्या या गडातच ओहोटी लागल्याचे बोलले गेले. प्रथम महापौर, प्रथम आमदार तसेच प्रथम जिल्हाप्रमुखासह अनेक नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. महापालिकेत शेवटच्या काही महिन्यांमध्ये मनसेने सीएसआर फंडातून शहरात चांगली विकासकामे केली असली तरी त्यांचे ब्रँडिंग करण्यात अपयश आले. विधानसभा आणि महापालिकेतला पराभव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे ठाकरेंनी नाराज होत नाशिककडे पाठ फिरवली.

मनसेची कामे झाकण्याचा भाजपचा प्रयत्न :

मनसेचे प्रकल्प पुन्हा चर्चेत येणार नाही याचीच जणू काळजी महापालिकेत विराजमान झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधार्‍यांनी घेतलेली दिसते. किंबहुना अनेक प्रकल्प बंद पाडण्यात या मंडळींनी स्वारस्य दाखवले. बोटॅनिकल पार्क, इतिहास उद्यान यांसारखे चांगले प्रकल्प बंद करण्यात आलेत. महापालिकेतला कारभार तीन वर्षापासून भरकटत असल्याने भाजपपेक्षा मनसे कित्येकपटीने बरी होती, अशी नागरिकांची भावना झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्यानंतर विकासाऐवजी नाशिकचे एक एक प्रकल्प येथून पळवले जात असल्याने नागरिक नाराज आहेत. त्यामुळे हा टायमिंग साधून ठाकरेंनी नाशिकमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्षातील पदाधिकार्‍यांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या जात आहेत. करोनाचे संकट सरल्यावर शहरासह ग्रामीण भागात जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना आता पुरती धडकी भरल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत चमत्कार दिसेल?

प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. रतनकुमार ईचम यांना इगतपुरी, त्र्यंबक आणि सिन्नर तालुक्यात मोठी मोर्चेबांधणी केली असून लोकसभा मतदार संघात त्यांचे वर्चस्व हळूहळू वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकीत नाशिकला मनसेचा खासदार मिळेल असा विश्वास पदाधिकार्‍यांना आहे.

शहरातील सहाही विभागांत मोर्चेबांधणी ; जिल्ह्यात संघटनवाढ :

पक्षात एकेकाळी जुना- नवा असा वाद शिगेला पोहचला होता. सध्या मात्र जुने आणि नवे पदाधिकारी एकदिलाने काम करताना दिसतात. पक्षातील ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार यांचे मनसैनिकांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. त्याचप्रमाणे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, पालिकेतील गटनेत्या नंदिनी बोडके यांनी पंचवटीतील आपला दबदबा कायम ठेवला आहे. शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत मनसेत प्रवेश केलेल्या दिलीप दातीर यांनी विधानसभा निवडणुकीत भल्याभल्यांना घाम फोडला होता. पराभवाने खचून न जाता त्यांनी पश्चिम मतदार संघात नव्याने काम सुरु केले आहे. शिवाय पक्षातील जिल्हाध्यक्षपदाची धुरा ते सक्षमपणे सांभाळत आहे. उपजिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी नवीन नाशिक भागाची मोर्चेबांधणीस वेग आणला आहे. मध्य नाशकात माजी आमदार नितीन भोसले, नगरसेविका वैशाली भोसले यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. सातपूर विभागात सलीम शेख, योगेश शेवरे यांच्यासारख्या नगरसेवकांनी पक्षाला बळकटी दिली आहे. नाशिकरोड विभागात सुनील पाटोळे यांनी कोणतेही मोठे पद न घेता काम सुरु ठेवले आहे. तसेच पक्षाचे माजी विभागअध्यक्ष साहेबराव खर्जुल, चाडेगाव येथील धडाडीचे शहर सरचिटणीस गोकूळ नागरे, पळसे येथील रहिवासी तथा नाशिक तालुकाध्यक्ष सुनील गायधनी यांनीही मनसेचे काम पुढे नेले आहे. सिन्नरमधील काम विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप केदार हे प्रभावीपणे करत आहेत.

- Advertisement -

नव्या दमाचा शहराध्यक्ष :

शहराध्यक्षपदी अंकुश पवार यांची नियुक्ती करुन पक्षश्रेष्ठींनी धाडसी निर्णय घेतला आहे. पवारांमुळे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात पक्षात प्रवेश करीत आहे.

मनविसेची घोडदौड :

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कामही जोरदारपणे सुरु आहे. किंबहुना विद्यार्थी चळवळ जागृत ठेवण्यात मनविसेचा मोठा हातभार आहे. सेनेचे जिल्हाध्यक्ष श्याम गोहाड यांनी वेळोवेळी शैक्षिणिक आणि तरुणांशी संबंधित प्रश्नांना वाचा फोडून त्यांची सोडवणूक केली आहे. त्यांना मनविसेचे सरचिटणीस सिद्धेश सानप यांचीही चांगली साथ मिळत आहे. मनविसेचे जिल्हा सरचिटणीस उमेष गायधनी यांनीही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. याशिवाय पक्षातील फादर बॉडी, महिला सेना, विध्यार्थी सेना, वाहतूक सेना व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी पक्षवाढीसाठी जीवाचे रान करीत आहेत.

पालिकेच्या आगामी निवडणुकीत मनसेचा ‘राज’ चालणार
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -