Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र एकाच दिवसात मोडक सागर, तानसा तलाव ओव्हरफ्लो

एकाच दिवसात मोडक सागर, तानसा तलाव ओव्हरफ्लो

मुंबईकरांसाठी आनंदवार्ता; एका महिन्यात, एकाच आठवड्यात चार तलाव ओव्हरफ्लो

Related Story

- Advertisement -

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सात तालावांपैकी तुळशी व विहार तलाव हे अगोदरच भरले आहेत. तर गुरुवारी मध्यरात्री ३.३४ वाजताच्या सुमारास मोडकसागर तलाव आणि सकाळी ५.४८ वाजताच्या सुमारास तानसा तलाव हे दोन्ही तलाव भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे आतापर्यंत सात तलावांपैकी चार तलाव भरून वाहू लागले आहेत. यामध्ये, मुंबईतील तुळशी ( ८,०४६ दशलक्ष लिटर) व विहार ( २७,६९८ दशलक्ष लिटर) हे तलाव अगदीच कमी पाणीसाठा असलेले तलाव आहेत. तर मुंबई बाहेरील मोडकसागर ( १,२८,९२५ दशलक्ष लिटर) व तानसा ( १,४५,०८० दशलक्ष लिटर) हे दोन तलाव चांगल्या क्षमतेचे आहेत.

हे चारही तलाव भरल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांत गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ७ लाख ७९ हजार ५६८ दशलक्ष लिटर (५३.८६ टक्के) इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. मुंबईला सध्या दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. त्यानुसार तलावातील एकूण पाणीसाठा पाहता त्याचे गणित केल्यास हा पाणीसाठा मुंबईला पुढील २०३ दिवस पुरेल इतका म्हणजेच पुढील सहा महिने १८ दिवस म्हणजेच ८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पुरेल इतका आहे.

- Advertisement -

भातसा तलाव ५० टक्के भरला
मुंबईला दरवर्षी पावसाळा संपल्यावर म्हणजे १ ऑक्टोबर पासून पुढील वर्षभरासाठी सात तलावांत मिळून एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. त्यामुळे मुंबईकरांना वर्षभरासाठी कपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागत नाही. मुंबईला आवश्यक असलेल्या एकूण पाणीसाठ्यापैकी ७ लाख १७ हजार ३७ दशलक्ष लिटर म्हणजे (५० टक्के) पाणीसाठा हा एकटया भातसा तलावामधून होतो. त्यामुळे हा तलाव भरणे मुंबईकरांसाठी आणि शेतकर्‍यांसाठी महत्वाचे आहे. कारण याच तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि सिंचनासाठी केला जातो. सध्या या तलावात ३ लाख ६८ हजार १८४ दशलक्ष लिटर (५१.३५ टक्के) इतका पाणीसाठा जमा झालेला आहे.

एकाच महिन्यात, एकाच आठवड्यात चार तलाव भरले
गेल्या काही दिवसांत मुंबई व ठाणे जिल्ह्यातील तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने तलावांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे जुलैमध्ये म्हणजे एका महिन्यात, एकाच आठवड्यात चार तलाव ओव्हरफ्लो मुंबईतील पवई परिसरातील पवई तलाव १२ जून रोजी दुपारी ३ वाजता भरून वाहू लागला होता. पवई तलावातील पाणी क्षारयुक्त असल्याने त्या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त व्यावसायिक कामांसाठी केला जातो. भांडुप संकुल परिसरातील तुळशी तलाव हा १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तर विहार तलाव १८ जुलै रोजी सकाळी ९ वाजल्यापासून भरून वाहू लागला आहे. ठाणे जिल्ह्यातील मोडक सागर तलाव २२ जुलै रोजी मध्यरात्री ३.३४ वाजता आणि तानसा तलाव हा २२ जुलै रोजी सकाळी ५. ४८ वाजता भरून वाहू लागला आहे.

- Advertisement -

पाणीसाठ्यात अवघ्या ३ दिवसात ३,६४,३९३ दशलक्ष लिटरने वाढ
मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सात तलावांत १९ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत ४ लाख १५ हजार १७५ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झालेला होता. मात्र, अवघ्या तीन दिवसात तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने पाणीसाठ्यात तब्बल ३ लाख ६४ हजार ३९३ दशलक्ष लिटर पाण्याची वाढ झाली आहे. म्हणजेच जवळजवळ ९५ दिवसांच्या म्हणजेच ३ महिन्यांच्या पाणीसाठ्याची वाढ झाली आहे.

तलावातील पाणीसाठा, पावसाची नोंद
तलाव आजचा पाणीसाठा
पाणीसाठा क्षमता
दशलक्ष लि. दशलक्ष लि.

अप्पर वैतरणा ९,७८० २,२७,०४७

मोडकसागर १,२८,९२५ १,२८,९२५

तानसा १,४५,५९३ १,४५,५९३

मध्य वैतरणा ९२,३४२ १,९३,५३०

भातसा ३,६८,१८४ ७,१७,०३७

विहार २७,६९८ २७,६९८

तुळशी ८,०४६ ८,०४६

एकूण ७,८०,५६८ १४,४७,३६३

- Advertisement -