Homeदेश-विदेशModi Govt : संजय राऊत म्हणतात - नितीश कुमार एनडीएमध्ये राहतील का,...

Modi Govt : संजय राऊत म्हणतात – नितीश कुमार एनडीएमध्ये राहतील का, याबाबत मला शंका!

Subscribe

नितीश कुमार बाहेर पडल्याने मोदी सरकार अल्पमतात आले तर, इंडि आघाडीचे सरकार येईल. पण त्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा कशासाठी पाहिजेत? असे त्यांनी देशात काय दिवे लावले आहेत?

(Modi Govt) मुंबई : सद्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काळात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी, नितीश कुमार इंडि आघाडीत परतणार असल्याचे संकेत दिले होते. त्यापाठोपाठ आता खासदार संजय राऊत यांनीही, नितीश कुमार एनडीएमध्ये राहतील का, याबाबत शंका व्यक्त केली आहे. (Sanjay Raut predicted the possibility of Nitish Kumar leaving the NDA)

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘आपलं महानगर – माय महानगर डॉट कॉम’चे संपादक संजय सावंत यांनी आमदार आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी नितीश कुमार यांच्याबद्दल सूचक विधान केले होते. जदयूचे नितीश कुमार पुढच्या तीन-चार महिन्यांत आमचे मित्र बनतील हे भाजपाला कळणारदेखील नाही, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.

हेही वाचा – Sanjay Raut About Fadnavis : फडणवीस यांचे कौतुक थांबेना, काय म्हणाले संजय राऊत?

त्याच अनुषंगाने खासदार संजय राऊत यांनीदेखील आज, शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना तशीच शक्यता व्यक्त केली. नितीश कुमार यांचे 10 खासदार फोडण्याचे काम भाजपा करत आहे. नितीश कुमार हे भाजपाप्रणित रालोआचा घटक पक्ष असताना हे सुरू आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेले नितीश कुमार भाजपाप्रणित एनडीएमध्ये राहतील की नाही, याबाबत मला शंका वाटते. मित्राच्या पाठीत वार करायचा, हे भाजपाचे धोरण बिहारमध्येही सुरू झाले आहे, असे ते म्हणाले.

नितीश कुमार बाहेर पडल्यास ठाकरे गट एनडीएमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत भडकले. नितीश कुमार बाहेर पडल्याने मोदी सरकार अल्पमतात आले तर, इंडि आघाडीचे सरकार येईल. पण त्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा कशासाठी पाहिजेत? असे त्यांनी देशात काय दिवे लावले आहेत? असा उलट प्रश्न त्यांनी केला.

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदी यांना शपथविधीला बोलवायला तयार नाहीत. ही त्यांची पत आहे. देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर गेले 15 दिवस व्हाइट हाऊसच्या बाहेर तळ ठोकून बसले आहेत. जगातील लहान-मोठ्या देशांच्या प्रमुखांना निमंत्रण दिले आहे. पण मोदी यांना निमंत्रण नसल्याने विश्वगुरू अस्वस्थ आहेत. अशा प्रकारे ज्यांची प्रतिष्ठा ढासळत आहे, त्यांच्या हाती देशाची सूत्रे पुन्हा का द्यायची, असे ते म्हणाले. (Modi Govt: Sanjay Raut predicted the possibility of Nitish Kumar leaving the NDA)

हेही वाचा – Santosh Deshmukh Murder : …म्हणूनच सुरेश धस बोलत आहेत, संजय राऊत यांचा रोख कोणाकडे?