घरताज्या घडामोडीमोदीजी, कोरोनामुळे हजारो चिता जळतायत, आता तरी जनतेच्या जिवीतास गांभीर्याने घ्या -...

मोदीजी, कोरोनामुळे हजारो चिता जळतायत, आता तरी जनतेच्या जिवीतास गांभीर्याने घ्या – नाना पटोले

Subscribe

मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची मोदींना हौस

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने परिस्थिती गंभीर झाली आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येने देशात मृत्यूची संख्या वाढत आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूदर वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र पश्चिम बंगालमध्ये प्रचारामध्ये व्यस्त आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करत खोचक टीका केली आहे. कोरोना महामारीच्या संकटाची चाहूल लागताच काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धोक्याची जाणीव करून दिली होती. महामारीच्या या वर्षभरात सातत्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सकारात्मक सूचना केल्या परंतु सत्तेच्या अहंकाराने आपल्याच मस्तीत दंग असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, राहुल गांधी यांना गांभीर्याने घेत नाही असे म्हणत त्यांची खिल्ली उडवण्याचा पोरकटपणा करत राहिले.

राहूल गांधींच्या सूचनांना गांभीर्याने घेतले असते तर…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की राहुल गांधींनी वेळोवेळी केलेल्या विधायक सूचनांना मोदी सरकारने गांभीर्याने घेतले असते तर आज देशात हजारो चिता जळतानाचे विदारक चित्र पाहण्याची वेळ आपल्यावर आली नसती. आतातरी मोदी सरकारने झोपेतून जागे व्हावे आणि १३० कोटी जनतेच्या जिवीताकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

- Advertisement -

या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशात कोरोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाच्या रूग्णसंख्येत दररोज दोन लाखांपेक्षा जास्त रूग्णांची भर पडत आहे तर हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. रुग्णालयात बेड्स मिळत नाहीत, रेमडेसिवीर व ऑक्सीजनअभावी रुग्णांचे जीव जात आहेत आणि अंत्यसंस्कारासाठीसुद्धा रांगा लावाव्या लागत आहेत असे विदारक चित्र देश उघड्या डोळ्यांनी पहात आहे. परंतु केंद्रातील भाजप सरकारला याचे काही सोयरसुतक नाही. देश कोरोनाच्या आगीत होरपळत असताना देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे. हा बेफिकीरपणाच आज देशातील जनतेच्या मुळावर उठला आहे.

सूचनांकडे दूर्लक्ष केल्याचे फळ जनता भोगतेय

कोरोनाचा प्रार्दुभाव सुरु झाल्यापासून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारला आर्थिक पातळीवर होऊ शकणारे नुकसान तसेच वैद्यकीय क्षेत्रात करावयाच्या उपाययोजनांवर सूचना करत असताना देशाचे पंतप्रधान मात्र जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवायला आणि दिवे लावायला सांगत होते. १२ फेब्रुवारी २०२० रोजी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला गंभीर परिणामाचा इशारा दिला होता आज एक वर्षानंतरही तीच परिस्थिती कायम आहे. नोटाबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली जीएसटीची अंमलबजावणी, कोणतीही पूर्वसूचना न देता व नियोजन न करता अचानक लावलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ऐतिहासिक रसातळाला गेली. लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरिबांच्या बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्याची सूचना राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली होती पण नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले गेले त्याची फळं देशातील गरीब जनता भोगते आहे.

- Advertisement -

तर परिस्थिती आणखी गंभीर होईल

कोरोनाला रोखण्यासाठी सध्यातरी लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे जगभरात उपलब्ध असणा-या लसींना परवानगी देऊन देशातील लसीकरणाचा वेग वाढवावा अशी सूचना राहुल गांधी केली होती. त्यावेळी राहुल गांधी औषध कंपन्यांसाठी लॉबिंग करत असल्याचा पोरकट आरोप केला आणि नंतर चार दिवसातच केंद्र सरकारने परदेशी लसींना परवानगी दिली. कोरोना लसीकरणासाठी वयाची अट शिथील करून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची मागणी आम्ही केली आहे. सरकारने त्यावर गांभीर्यांने विचार करून तातडीने निर्णय घेतला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल.

महामारीच्या काळात हीन राजकारण

कोरोना महामारीच्या वर्षभराच्या काळात विरोधी पक्षांसह अनेक तज्ञांनी केलेल्या सूचनांकडे मोदी सरकारने डोळेझाक करून आपले राजकीय अज्ञान उघड केले आहे. राज्यातील भाजप नेतेही कोणालाच गांभीर्याने घेत नाही अशी विधाने करून या महामारीच्या काळात हीन राजकारण करत आहेत. केंद्र सरकारचे अपयश झाकण्यासाठी सतत विरोधी पक्षांच्या सरकारवर टीका करणे हा एककलमी कार्यक्रम भाजप नेत्यांनी हाती घेतला आहे. संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन मुकाबला करणे अपेक्षित असताना आपले राजकीय दुकान चालू रहावे यासाठी त्यांची धडपड सुरु असून भाजपाचा विकृत चेहरा आता जनतेसमोर आला असून जनताच आता त्यांना गांभीर्याने घेणार नाही.

मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची मोदींना हौस

देशभरात कोरोना वेगाने वाढत असताना त्यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि अख्खा भारतीय जनता पक्ष फक्त पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात दंग आहे. लोक वैद्यकीय उपचाराअभावी प्राण सोडत असताना ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची मोदींची हौस अजून संपलेली दिसत नाही. गरीब, असहाय्य जनतेच्या मृतदेहावर उभे राहून निवडणुकीचा प्रचार करणारा पंतप्रधान म्हणून देशाच्या इतिहासात नरेंद्र मोदींची नोंद होईल, असे नाना पटोले म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -