घरताज्या घडामोडीसरसंघचालकांची संसदीय शिकवण !

सरसंघचालकांची संसदीय शिकवण !

Subscribe

धर्मसंसदेतील वादग्रस्त वक्तव्यांचे समर्थन होऊ शकत नाही, संघ किंवा हिंदुत्वाचे अनुयायी अशा वक्तव्यांवर विश्वास ठेवत नाहीत. धर्म संसदेत केलेली विधाने हिंदुत्वाला शोभणारी नाहीत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. मुंबईत नुकत्याच झालेल्या ‘राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदुत्व’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात धर्म संसदेतील वक्तव्यावरून जो वाद सुरू आहे, त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. हरिद्वारला झालेल्या धर्म संसदेत काही कथित साधू महंतांनी केलेल्या वक्तव्यावरून देशात मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणात काही लोकांवर कारवाईदेखील झालेली आहे.

यावेळी भागवत यांनी जे लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेऊन आततायी विधाने करत आहेत, त्यांना समज देताना सावरकर हे अखिल हिंदूंच्या संघटनाबद्दल आणि विकासाबद्दल आग्रही होते. त्यांनी हिंसावादी वृत्तीचा पुरस्कार केलेला नाही आणि अशा वृत्तीचे समर्थनही केले नाही, असे सांगितले. सरसंघचालक मोहन भागवत यांचा हा विचार अतिशय व्यापक आहे आणि जे हिंदुत्वाच्या ढालीचा वापर करून आपल्या मनमानी तलवारी चालवत आहेत, त्यांचे डोळे उघडणारा आहे. कारण कुठल्याही गोष्टीची धुंदी चढली की, लोक काय बोलतील, याचा अदमास बांधता येत नाही. शस्त्राचा आघात ठराविक माणसांवर होतो, तर शब्दांचा आघात हा एकाच वेळी अनेकांवर होतो आणि तो पुन्हा पुन्हा होत राहतो. त्यामुळे सामाजिक शांततेचा भंग होतो, पण या भंगातही रंग भरण्यात अनेकांना आनंद होत असतो. कुठल्याही धर्माची संसद आणि एकत्रिकरण असले की, त्या धर्मातील धार्मिक आणि आध्यात्मिक गुरू एकत्र येतात आणि त्यांचे विचार व्यक्त करतात.

- Advertisement -

अर्थात, ते विचार हे त्यांच्या धर्माच्या अनुयायांसाठी हिताचे आणि उद्धाराचे असतात, पण जोपर्यंत ते स्वत:च्या धर्माच्या उद्धारापर्यंत मर्यादित असतात, तोपर्यंत त्याला आक्षेप घेण्यासारखे काहीच नसते. पण जेव्हा आपल्या किंवा दुसर्‍या धर्मातील लोकांच्या भावना दुखावतील अणि समाजातील शांतता बिघडेल, अशी विधाने केली जातात, तेव्हा मात्र अशी विधाने करणार्‍यांना आवर घालणे आवश्यक असते. व्यक्ती कुठल्याही धर्माची असो, ती जर सामाजिक शांतता आणि सामंजस्य बिघडविणारी विधाने करत असेल तर भारतात जे कायदे आहेत, त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होते. हरिद्वार येथे जी हिंदू धर्मसंसद झाली त्यात वादग्रस्त विधाने करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. पण हेच करत असताना दुसरीकडे ते स्वत:ला लोकप्रियता मिळवत आहेत. सध्या समाज माध्यमांचा मोठा प्रभाव आहे, तसेच चोवीस तास चालणारी इलेक्ट्रॉनिक्स प्रसार माध्यमे आहेत. त्यामुळे राष्ट्रहिताचा आव आणून वादग्रस्त विधाने केली की, आपल्याला एका बाजूला सुरक्षितता मिळते आणि दुसर्‍या बाजूला लोकप्रियता मिळते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी जेव्हा संघाची स्थापना केली, त्यावेळी अगोदरपासून काही हिंदुत्ववादी संघटना कार्यरत होत्या, त्यांचा त्यावेळी समाजावर पगडा होता, पण त्या संघटनांमध्ये ते सहभागी झाले नाहीत. त्यांनी वेगळ्या संघटनेची स्थापना केली. त्या संघटनेला धर्माचा आधार असला तरी त्यातून धार्मिक रुढी परंपरा वगळण्यात आल्या. या संघटनेच्या माध्यमातून हिंदू संघटन आणि देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा त्यांचा मूळ हेतू होता. पुढे देश स्वतंत्र झाला. संघ ही जशी एक सांस्कृतिक संघटना आहे, तशीच त्याला राजकीय विचारसरणीची पार्श्वभूमी आहे. लोकमान्य टिळक काँग्रेसचे प्रमुख असताना संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार काँग्रेसमध्ये होते, पण पुढे जेव्हा जहालवादी विचारसरणी मानणारे लोकमान्य टिळक यांचे निधन झाले आणि मवाळवादी महात्मा गांधी स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख झाले तेव्हा हेडगेवार यांना मवाळवादाने देशाला स्वातंत्र्य मिळेल असे वाटत नव्हते. ब्रिटिशांना या देशातून हद्दपार करायचे असेल तर त्यांना सशस्त्र उत्तर द्यावे लागेल, असे त्यांना वाटत होते. त्यामुळेच त्यांनी संघ शाखांच्या माध्यमातून तशी माणसे तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली.

- Advertisement -

जहालवादी आणि मवाळवादी या दोन प्रमुख विचारसरणी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आघाडीवर होत्या. काँग्रेस पूर्वीपासून राजकारणात होती, पण ती गांधीजींच्या नेतृत्वातील मवाळवादी काँग्रेस होती. तर लोकमान्य टिळकांची विचारसरणी मानणार्‍या हेडगेवारांनी संघाची स्थापना केली. पुढे संघाच्याच विचारसरणीच्या नेत्यांनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली आणि पुढे आणीबाणीनंतर संघ विचारांच्याच मंडळींनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. अशा प्रकारे काँग्रेस आणि भाजप हे दोन राष्ट्रीय पक्ष सध्या भारताच्या राजकारणात आहेत. अन्य पक्ष असले तरी त्यांचा विस्तार एका राज्यापुरता किंवा काही राज्यांमध्ये अगदी कमी प्रमाणात आहे. त्यामुळे या दोन पक्षांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन होत असते. पूर्वी काँग्रेसला बहुमत मिळत असे, पण राजीव गांधी यांच्यानंतर परिस्थिती बदलली.

२०१४ नंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला बहुमत मिळाले. भाजपमधील बहुतांश मंडळी ही संघाच्या संस्कारातूनच पुढे आलेली असतात. भाजप ही संघाची राजकीय शाखा आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला जे बहुमत मिळाले आहे, त्यामागे संघाच्या स्वयंसेवकांची मोठी मेहनत आहे, हेही विसरून चालणार नाही. भाजपला केंद्रात बहुमत मिळाल्यानंतर संघाचाही आत्मविश्वास अधिक वाढला आहे. कारण सत्ता असल्याशिवाय अपेक्षित परिवर्तन करता येत नाही. अखंड आणि एकसंध भारत निर्माण करण्यासाठी काश्मीरमधील ३७० कलम रद्द होणे आवश्यक होते, ते भाजप सरकारने केले. त्याचसोबत अयोध्येत राम मंदिरांची उभारणी यासाठी अनेक शतकांपासून हिंदूंचा संघर्ष सुरू होता, ते कार्यही सिद्धीस जात आहे. भारतातील सगळ्या नागरिकांना समान नागरी कायदा लागू असावा, यासाठीही भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. संघाचा राजकारणात थेट सहभाग नसला तरी भाजपचा पाया हा संघ आहे.

भाजपला जसे राजकीय यश मिळत आहे, त्याचबरोबर हिंदूमधील धर्मवादी लोकही जोर धरू लागले आहेत. भाजपला सोयीची वाटू शकतात, अशा प्रकारची वक्तव्ये ही मंडळी करू लागली आहेत. पण अशा या कट्टरवादाने हिंदू धर्माचे मोठे नुकसान केलेले आहे हा इतिहास आहे. हिंदू धर्मातील धर्माचार्यांनी सर्वसमावेशकता राखली असती, तर अनेकांना हा धर्म सोडण्याची वेळ आली नसती. धर्म संसदेच्या माध्यमातून महात्मा गांधी यांच्यावर टीका करून त्यांच्या हिंसेचे समर्थन करणे हा प्रवास चुकीच्या मार्गाने सुरू आहे. भाजपमधील राजकीय नेत्यांना राजकीय गणित जमवण्यासाठी अशी माणसे काही काळ सोयीची वाटत असली तरी त्यातून देशाचे दीर्घकालीन नुकसान होईल. अशा वेळी सरसंघचालकांवर मोठी जबाबदारी येते. त्यामुळे धर्मसंसदेतील वादग्रस्त विधानांशी आपण सहमत नसल्याचे स्पष्ट करून संसदीय मार्ग अवलंबण्याची शिकवण त्यांनी दिली असावी. आता त्यातून कोण किती शिकतो ते पहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -